गोंदिया : शहराचा भाजी बाजार असलेल्या परिसरासह येथील गांधी प्रतिमा चौक ते श्री टॉकीज रोडवरही दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी राहत असल्याने या रस्त्यावरून अनेकदा पायी देखील जाता येत नाही. या गर्दीमुळे कोरोनाची तिसरी लाट कशी रोखली जाणार आहे. शहरातील अरुंद रस्त्यावर चारचाकी वाहनांना अनेकदा प्रवेशबंदी करण्यात आली. परंतु या भागात काही लोकांचे वास्तव्य असल्याने त्यांना त्यांचे चारचाकी वाहन घरी नेण्यापासून कसे थांबविता येईल. म्हणून त्यांना चारचाकी नेण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर कोरोना काळातही गर्दीच दिसून येत आहे.
.............................
रोज १० हजार लोकांची ये-जा
गोंदियातील मुख्य बाजारात दररोज १० हजार लोक तालुक्याच्या ठिकाणातून येतात. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील नागरिकदेखील साहित्य खरेदी करण्यासाठी गोंदियात येऊन गर्दी करतात.
....................
फूटपाथ कागदावरच
शहरात आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर फूटपाथच नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ असणे आवश्यक असताना येथील बाजारपेठेच्या रस्त्यावर फूटपाथच नसून ते फक्त कागदावरच आहे.
....................
अतिक्रमण हटावचा परिणामच होत नाही
शहरातील अनेक रस्त्यांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम शहर पोलीस, जिल्हा वाहतूक शाखा व नगर परिषद राबविते. परंतु मोहीम आटोपताच पुन्हा अतिक्रमण केले जाते.
....................
गर्दीतही सुसाट वाहन
शहरातील मुख्य बाजार परिसरात असलेल्या गांधी प्रतिमा ते श्री टाॅकीज रोडवर गर्दी असली तरी शहरातील काही तरुण या रस्त्यावरून सुसाट वाहन हाकत असतात. परंतु त्यांच्यावर कारवाई होतानाचे चित्र दिसत नाही.
.................
पायी चालताना वाटते भीती
गर्दीतही सुसाट वाहन चालविले जात असल्याने गर्दीतून आपण मार्गक्रमण करतानाही जोरात वाहन चालविणारा तरुण कधी आपल्या अंगावर वाहन चढवेल ते सांगता येत नाही. म्हणून या रस्त्याने पायी-चालतानाही भीती वाटते.
....................
कोट
शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम आपण राबविलेली आहे. अतिक्रमण झाल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला जोमाने सुरुवात करू. अतिक्रमण करून विकासात अडचण आणू नये.
- करण चव्हाण,
मुख्याधिकारी, नगर परिषद गोंदिया