गोंदिया : आईपासून ताटातूट होत वाघाचा एक चार महिन्याचा बछडा गोरेगाव तालुक्यातील गराडा परिसरातील शेतशिवारात भटकला. या बछड्याने गराडा परिसरातील कालव्याजवळ आठ ते दहा तास ठाण मांडले होते. ही घटना गुरुवारी (दि.३) सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
गोरेगाव तालुक्याला नागझिरा अभयारण्याची सीमा लागून आहे. या परिसरात नेहमीच वन प्राण्यांचा वावर असतो. तर तीन चार महिन्यांपूर्वी याच परिसरात वाघाच्या बछड्यांचा रेल्वे कटून मृत्यू झाला होता. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गराडा गावलगताच्या कालव्याच्या परिसरातील झुडपात वाघाचा एक बछडा शेतकऱ्यांना आढळला. याची माहिती त्यांनी वन विभाग व मानद वन्यजीव संरक्षकाना दिली. माहिती मिळताच मानद वन्यजीव संरक्षक सावन बहेकार घटनास्थळी पोहोचले. तर वनविभागाचे अधिकारी हे घटनास्थळी उशिरा पोहोचल्याची माहिती आहे.
वाघाचा बछडा हा चार महिन्यांचा असून त्याची आईसुद्धा याच परिसरात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान या बछड्याने दुपारी ४ वाजेपर्यंत गराडा परिसरातील शेतशिवारात ठाण मांडले होते. यानंतर तो जंगलाच्या दिशेने गेल्याची माहिती आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाचा बछडा हा नागझिरा अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रात दाखल झाल्याचे ट्रॅप कमेऱ्यांवरून स्पष्ट झाल्याचे सांगितले. बछड्याच्या आईचा शोध घेण्यासाठी या परिसरातील ट्रॅप कॅमेऱ्यांचा आधार घेतला जात आहे. काही ठिकाणी पुन्हा ट्रॅप कॅमरे लावण्यात आले असल्याचे सहायक उपवनसंरक्षक सदगीर यांनी सांगितले.
गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा
गोरेगाव तालुक्यातील गराडा परिसरात वाघाचा बछडा आढळल्याने त्याच्या शोधात त्याची आईपण या परिसरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गावकरी आणि वन्यजीवांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा वन विभागाने दिला. तसेच यासाठी गावात जनजागृतीसुद्धा केली जात आहे.
चार टीमची राहणार नजर
गराडा परिसरात वाघाचा बछडा आढळल्यानंतर त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने व त्याच्या आईचा शोध घेण्यासाठी वन विभागाने कर्मचाऱ्यांच्या चार टीम गठित केल्या आहेत. तसेच या परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्यासुद्धा वाढविण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.