गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील सटवा गावाच्या हद्दीतील एका फार्महाउसवर पार्टीकरिता आलेल्या युवक-युवतींनी सटवा गावात चारचाकी वाहनाने फिरत हुल्लडबाजी केली. त्यांना हुल्लडबाजी करू नका म्हणून समजाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गावकरी व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी असभ्य वर्तणूक केली. त्यामुळे शेकडो नागरिकांनी फार्महाउसला घेराव घातला. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
सटवा येथे अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतशिवारात गोंदिया येथील एका उद्योगपतीने आलिशान फार्महाउस बांधले आहे. या फार्महाउसवर रविवारी वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीनिमित्त आलेल्या काही तरुण व तरुणींनी चारचाकी वाहनाने गावात फेरफटका मारत गाडीवर डीजेचे गाणे वाजविले. इतकेच नव्हे, तर हातवारे करत हुल्लडबाजी केली. त्यामुळे गावातील चौकात ग्रामपंचायत सदस्य ठाकूर यांनी त्यांना थांबवून हे गाव आहे. अशाप्रकारची हुल्लडबाजी योग्य नाही. जे करायचे ते फार्महाउसच्या आत करा असे सांगून त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या युवक-युवतींनी त्यांच्याशी वाद घालून मारहाण करण्याचा प्रयत्न केला व तिथून ते फार्महाउसवर पोहोचले.
या प्रकरणाची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. आपल्याच गावात येऊन हुल्लडबाजी करून गावातील पदाधिकाऱ्यांवर हात उगारण्याचा प्रकार असह्य झाल्याने किमान १०० ते १५० नागरिकांनी फार्महाउससमोर जमा होत घटनेचा निषेध केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना घटनास्थळावरून पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.
गावकऱ्यांनी फार्महाउसला घेराव घातल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची मात्र अद्याप कोणीही तक्रार केली नाही.
- केंजळे, पोलिस निरीक्षक, गोंदिया ग्रामीण, पोलिस ठाणे.