गोंदिया : तिरोडा नगर परिषद मालकीची सार्वजनिक दैनिक गुजरीचे लिलाव १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत करीत असताना निर्धारित केलेले वसुलीचे दर स्थायी समितीने स्वत:च्या मर्जीने ठरविल्याचा आरोप दुकानदार, शेतकरी व नागरिकांनी केला आहे. तसेच सदर निर्धारित दर रद्द करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.निवेदनानुसार, वसुलीचे दर ठरविण्यापूर्वी दैनिक गुजरी दुकानदार, कृषी माल आणणाऱ्या शेतकरी व नागरिकांची सूचना मागविण्यात आली नाही. तसेच स्थायी समितीने ठरविलेल्या दरावर दुकानदार व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास कसलाही वेळ देण्यात आला नाही. त्यामुळे निर्धारित दर दैनिक गुजरी दुकानदार, शेतकरी व नागरिकांच्या हिताचे नसून नियमबाह्य आहे. हे नियमबाह्य ठरविलेले दर वसूल करण्यासाठी कंत्राटदार १ एप्रिल २०१५ पासून चुकीची माहिती देवून दबाव टाकतात व धमकावतात. दैनिक गुजरी वसुली करताना ज्या शेतकरी व दुकानदारांनी वसुली देण्यास नकार दिला, त्यांच्याशी वाद घालून वसुली केली जात आहे. तसेच किरकोळ भाजी विक्रेत्या दुकानदारांनी त्यांच्या दुकानासाठी विकत घेवून विक्रीकरिता आणलेल्या मालावरसुद्धा वेगळे दर आकारून कंत्राटदार वसुली करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे.२४ मार्च २०१५ रोजी लिलाव झाल्यानंतर काही दुकानदार व शेतकऱ्यांना बोलावून नियमबाह्य ठरविलेले चुकीचे दर देण्याचे कळविण्यात आले. यावर शेतकऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना २७ मार्च २०१५ रोजी अर्ज देवून वाढविलेले दर कमी करण्याची विनंती केली. परंतु यावर कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ३१ मार्च २०१५ रोजी प्रत्यक्ष मुख्याधिकाऱ्यांची भेट घेवून वाढविलेले दर कमी करण्याची विनंती करण्यात आली. यावर स्थायी समितीची बैठक बोलावून दर कमी करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते. तसेच स्थायी समितीच्या सभेत पुढील निर्णय होईपर्यंत जुन्या दराने वसुली करण्याचे आश्वासनसुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी दिले होते. तशी सूचना कंत्राटदारांना देण्याचे आल्याचे दुकानदार व शेतकऱ्यांना कळविण्यात आले होते. परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसून नियमबाह्य वाढविलेल्या दरानेच सक्तीने वसुली केली जात आहे. ही बाब दुकानदार, शेतकरी व नागरिकांच्या विरोधाची असून नवीन दराने वसुली रद्द करून कमी करणे आवश्यक आहे. जुने दर व नवीन दरात फारच तफावत आहे. तेव्हा वाढीव दराप्रमाणे व दुकानदार व शेतकऱ्यांनी नमूद केल्याप्रमाणे दर देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी तत्काळ स्थायी समितीची बैठक घेवून नियमबाह्य दर रद्द करून कमी करावे व सामंजस्याने वसुलीची कार्यवाही करण्याची मागणी परमेश्वर बनकर, राजेंद्र चौरे, बुधा बनकर, राजेंद्र चोपकर, नरेश विठोले, चैनराम किरपानकर, राधेश्याम मुटकुरे, चंद्रभान ठाकरे व इतर सव्वाशे दुकानदारांनी केली आली आहे. (प्रतिनिधी)
निर्धारित केलेले दर त्वरित रद्द करा
By admin | Published: April 09, 2015 1:02 AM