शेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील दल्ली (रेंगेपार) अंतर्गत येणाऱ्या तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या घरापासून केवळ ९ किमी अंतरावर असलेल्या सलंगटोला येथील गावकऱ्यांना रस्त्याअभावी लग्न समारंभासाठी स्वत: रस्ता तयार करावा लागतो. हे वाचून विश्वासही बसणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे.सलंगटोला हे शंभर टक्के आदिवासी लोकांचे २० घरांचे खेडे आहे. त्याचे अंतर तालुक्यापासून व पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे घरापासून केवळ ९ किमी अंतरावर असून त्यांच्याच कार्यक्षेत्रात येते. सन १९३५ पासून या खेडेगावात फक्त आदिवासीच राहतात. परंतु त्या गावाला जाण्यायेण्यासाठी हक्काचा रस्ता नाही. त्यामुळे धुऱ्यापारीने जाणे-येणे करावे लागते. तसेच गावात लग्न समारंभ असला तर गावकऱ्यांनाच वऱ्हाड्यांच्या सोईसाठी कचऱ्याची साफसफाई करून रस्ता तयार करावा लागतो. सध्या याच गावातील युवक राजेश धुर्वे यांच्या बहिणीचे लग्न जुळले. लग्न सोहळ्याला वराकडील मंडळी कुठून येणार, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे. आप्तेष्ठांची गैरसोय होवू नये म्हणून त्याने गावातील कुरेश कुंभरे, अजय टेकाम, गोविंद कुंभरे, हेमराज टेकाम, अंबेलाल टेकाम, नामदेव धुर्वे व कुवर टेकाम या युवकांना सोबत घेवून वऱ्हाड्यांच्या सोईसाठी रस्ता सफाईच्या कामाला सुरूवात केली आहे. निवडणुकीच्या काळात नेतेमंडळी धुऱ्यापारीने येऊन मतांची मागणी करतात. त्यावेळी गावकरी रस्त्याचा मुद्या त्यांच्यासमोर ठेवतात. यावर प्रत्येक उमेदवार मला मत द्या, मी निवडून आल्यावर सर्वप्रथम रस्ता तयार करून देईन, असे आश्वासन देतात. परंतु निवडून आल्यावर ६५ वर्षाच्या काळात कोणत्याच उमेदवाराने रस्ता तर सोडाच पण भेटसुध्दा दिली नाही, असे त्या गावच्या वयोवृध्दांनी लोकमतला सांगितले. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत या परिक्षेत्रातील प्रत्येक खेडेपाडे डांबरीकरणाने जोडल्या गेले, यात दुमत नाही. पण सलंगटोल्यालाच का वगळण्यात आले, हा संशोधनाचा विषय आहे. गावकऱ्यांनी रस्त्याची समस्या प्रसार माध्यमाद्वारे अनेकवेळा मांडली. परंतु प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधिंनी त्याची साधी दखलही घेतली नाही. यावरून त्यांच्या कार्यप्रणालीची प्रचिती येते. पावसाळ्यात शालेय विद्यार्थ्यांना धुऱ्यापारीने डोंगरगाव, सडक-अर्जुनी व उशीखेडा येथे विद्याजर्नासाठी जावे लागते. एखाद्या वृध्दाची प्रकृती खराब झाली तर चारपाईने त्याला दल्लीपर्यंत न्यावे लागते. लग्न सोहळ्यासाठी स्वत: रस्त्याची सफाई गावकऱ्यांना करावी लागते. हे तेथील रहिवाशांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी करोडो रुपये खर्ची घालून त्यांचा सर्वांगिण विकास होत असल्याचा गवगवा करते. मग सलंगटोलावासीयांसोबत सावत्र व्यवहार का केला जातो? असा सवाल तेथील नागरिक करीत आहेत.प्रशासनाने व लोकप्रतिनिधिंनी सलंगटोलावासीयांच्या रस्त्याच्या समस्येला प्रथम प्राधान्य देऊन त्या गावाला हक्काचा रस्ता तयार करून द्यावा, हीच गावकऱ्यांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)
वऱ्हांड्यांना स्वत:च तयार करावा लागतो रस्ता
By admin | Published: April 22, 2016 3:43 AM