विजय मानकर
सालेकसा : मागील एक महिन्यापासून ४५ वर्षावयापेक्षा वरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. आतापर्यंत सालेकसा तालुक्यात एकूण ८ हजार ४७७ लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. दरम्यान, एकूण ४५३ डोस वाया गेल्या असून एकूण प्राप्त लसीपैकी पाच टक्के मात्र वाया गेली आहे.
२६ एप्रिलपर्यंत आरोग्य विभागाकडून तालुक्याला एकूण ९ हजार २५० डोस प्राप्त झाले. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध २६५० डोस मिळाले. त्यापैकी २५३७ डोस उपयोगात आले व ११३ डोस वाया गेले. प्राथमिक आरोग्य केंद्र सातगावला २२९० डोस मिळाले. त्यापैकी १ हजार ८३५ डोस लावण्यात आल्या असून तब्बल २४५ डोस वाया गेले. अर्थात एकूण प्राप्त मात्रेच्या ११ टक्के मात्रा वाया गेल्या. बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्राला एकूण २ हजार ११० डोस मिळाले. त्यापैकी १ हजार ९५० डोस उपयोगात आले असून ६० डोस वाया गेले. दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राला एकूण २२०० डोस मिळाले. त्यापैकी २ हजार १५५ डोस उपयोगात आणल्या असून ३५ डोस वाया गेल्या. तालुक्यात सरासरी पाच टक्के डोस वाया गेले तर एकूण ३२० ङोस शिल्लक राहिल्या. परंतु कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही लस शिल्लक नसून सातगाव २१०, बिजेपार १०० आणि दरेकसा येथे १० असे शिल्लक होत्या. त्यांचा उपयोग सुरू असून आता संपूर्ण तालुक्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण ७९ हेल्थ केअर वर्करना लस देण्यात आली असून त्यापैकी १९ लोकांना पहिला डोस तर ६० लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहे. फ्रंट लाईन वर्करपैकी एकूण २५० लोकांना लस देण्यात आली असून त्यामध्ये एकूण २०९ लोकांना पहिला डोस तर ४१ लोकांना दोन्ही डोस देण्यात आला आहे. ४५ ते ६० वर्ष वयोगट आणि गंभीर आजार असलेल्या तालुक्यातील एकूण ३ हजार ५९५ लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ३४७४ लोकांना पहिला डोस तर १२१ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ ते ६० वर्षांतील एकूण १११२ लोकांनी डोस लावला. त्यात १०५५ लोकांनी पहिला तर ५७ लोकांनी दुसरा डोस घेतला. सातगाव केंद्रात ७३८ लोकांना पहिला डोस आणि ३९ लोकांनी दुसरा डोस घेतला. बिजेपार केंद्रात ८७४ लोकांनी पहिला डोस घेतला परंतु दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या शून्य आहे. दरेकसा केंद्रात ८०७ लोकांनी पहिला डोस आणि २५ लोकांनी दुसरा डोस लावून घेतला आहे.
......
लसीकरणात ज्येष्ठ नागरिक पुढे
६० वर्षापेक्षा अधिक वयाच्या एकूण ४७९६ लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला असून त्यामध्ये ४६७३ लोकांनी पहिला ङोस तर १२३ लोकांनी दोन्ही डोस लावून घेतला आहे. त्यामध्ये कावराबांध केंद्रात १४३६ लोकांना पहिला डोस तर ७० लोकांचा दुसरा डोस झाला आहे. सातगाव केंद्रात ९७८ लोकांना पहिला डोस तर ५१ लोकांना दुसरा डोज झाला आहे. बिजेपार केंद्रात आतापर्यंत पहिलाच डोस देण्यात आला आहे. यात १०१३ लोकांचा समावेश आहे.
बॉक्स
लसीबद्दल जनजागृतीची गरज
तालुक्यात लसीकरण मोहीम ज्या गतीने चालत आहे. यावरून असे दिसत आहे की ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिक स्वयंस्फूर्तपणे कोरोनाची लस घेण्यासाठी पुढे येताना दिसत नसून आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला डोससुद्धा घेतला नाही. अशात लसीकरण मोहीम राबविताना लोकांमध्ये जनजागृती अभियानसुद्धा चालविण्याची गरज आहे.