गोंदिया : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने आता जिल्ह्यातून कोरोनाने परतीची वाट पकडल्याचे समाधानकारक चित्र आहे. रुग्णसंख्या जरी आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी बिनधास्त न राहता पूर्वीइतकी काळजी घेणे गरजेचे आहे.
गुरुवारी (दि.२७) जिल्ह्यात १२१ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ५६० वर पोहोचली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अशीच कायम राहिल्यास जिल्हा कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. मागील आठ दिवसांपासून शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्यासुद्धा आटोक्यात आली आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड रुग्णालयातील बेडसुद्धा रिकामे झाले आहेत. तर आरोग्य यंत्रणेवरील ताणसुद्धा कमी झाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १ लाख ५९ हजार ४४१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १ लाख ३४ हजार ५३२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत १५४७९० नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १३३३७३ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०५०४ कोरोनाबाधित आढळले. तर आतापर्यंत ३९२६३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ५६० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १९४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
...........
२५२० चाचण्या ४८ पॉझिटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १९२२ आरटीपीसीआर तर ५९८ रॅपिट अँटिजन अशा एकूण २५२० टेस्ट करण्यात आल्या. त्यात ४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रुग्णाचा पाॅझिटिव्हिटी रेट १.९० टक्के आहे. यावरून कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे.
......
२ लाख ३४ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात सध्या १४० केंद्रावरून लसीकरण मोहीम सुरू आहे. यांतर्गत आतापर्यंत २ लाख ३४ हजार ५९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
...................
संसर्ग आटोक्यात, पण दुर्लक्ष नकोच
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून रुग्णसंख्येला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे. दुसरी लोट आता पूर्णपणे ओसरायला लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी बिनधास्त न होता पूर्वीइतकी काळजी घेण्याची गरज आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.