जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरीही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक असताना एसटी बसचे चालक व वाहक बेफीकर असल्याचे चित्र केशोरी येथील बसस्थानकावर दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली आगारामधून साकोली-केशोरी या बसफेऱ्या नियमित सुरू आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये मास्क नाही तर बसमध्ये प्रवास नाही असे नियम घालून देण्यात आले होते, काही दिवस या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसून आले; परंतु अलीकडे कोणत्याच बसफेरीमध्ये वाहकांकडून प्रवासी मंडळींना मास्क लावण्याची सूचना दिली जात नाही किंवा मास्क आहे किंवा नाही हे पाहिलेसुद्धा जात नाही. शिवाय एसटीचे चालक व वाहक विना मास्क वावरताना दिसून येत आहेत. नुकत्याच गोंदिया जिल्ह्याला कोरोना केंद्रीय समितीने भेट देऊन कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. केंद्रीय पथकाने जिल्हावासीयांना कोरोनाबाबत सतर्कतेचा इशारा देऊन सावध केले आहे; परंतु परिवहन मंडळातील एसटीचे वाहक-चालक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. राज्य परिवहन महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन एसटीच्या वाहक व चालकांना मास्क लावण्याची सक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
एसटीचे वाहक आणि चालक विना मास्क वावरतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:31 AM