परसवाडा : दवनीवाडा येथे सीएसआर योजनेअंतर्गत सांस्कृतिक सभागृह मजूर करून ग्रामपंचायतने काम पूर्ण केले. मात्र, या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच बांधकाम साहित्यसुध्दा नियमांना धाब्यावर बसवून खरेदी केल्याची बाब पुढे आली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. आता हे प्रकरण जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेले असून ते काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी दुकानदाराकडून आपले हित जोपासत सांस्कृतिक भवनसाठी नियमांचे उल्लंघन करून इलेक्ट्रीक,फर्निचर उपलब्ध खरेदी केले. सरपंचांनी नियमांचे उल्लंघन करून आपल्याच स्वत:च्या हितासाठी सहीनिशी अवैध नोटीस, सभा व खोटे अर्ज सादर केल्याचा ठपका ठेवला आहे. या सर्व प्रकरणाची तक्रार अण्णा चौधरी यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी चौकशी केली असता दिलेले सांस्कृतिक सभागृह किरायाने देता येत नाही व सरपंच, ग्रामसेवक यांनी केलेली कार्यवाही नियमबाह्य आहे. चौकशीत ग्रामपंचायत कार्यालयात लाभार्थिचे अर्ज, करारनामा उपलब्ध नाही व देता येत नाही व सरपंच, सचिव दोषी असल्याच्या अहवालात विस्तार अधिकारी सी. एम. गावळ, डी. आर. लंजे यांनी गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांच्याकडे सादर केला. ते कार्यवाहीस पात्र असल्याचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी प्रदीप डांगे यांच्याकडे सादर केला आहे. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ८ एप्रिल रोजी सुनावणी आहे. याप्रकरणी आता काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.