गोंदिया : तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुंडीकोटा येथील जयकृष्ण भांडारकर यांची वडिलोपार्जित जमीन व घराचा हिस्सा सासरच्यांनीच विक्री करून फसवणूक केली. यासंदर्भात रेखा जयकृष्ण भांडारकर यांच्या तक्रारीवरून सासरच्या चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा यांचे पती तिरोडा तालुक्याच्या पांजरा येथे राहत होते. पती जयकृष्ण भांडारकर यांचे २०१४ मध्ये निधन झाले. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर खोट्या सह्या करून खोटे दस्तवेज तयार करून व त्यात खाडाखोड करून त्यांच्या हिश्श्याची जमीन विक्री करण्यात आली. रेखा यांच्या सासऱ्याने वडिलोपार्जित पांजरा येथील घर पाडून त्या जागी आरोपींनी आपले घर बांधले. आरोपी विलास कवडू भांडारकर, विकास कवडू भांडारकर, प्रकाश कवडू भांडारकर व वंदना प्रकाश भांडारकर, सर्व रा. पांजरा यांच्यावर तिरोडा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७०,३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. भांडारकर कुटुंबीयांचा वडिलोपार्जित जमीन वाटणीचा हिस्सा १३ जुलै २००३ रोजी केला होता. जयकृष्ण भांडारकर यांच्या हिश्श्याची जमीन प्रकाश भांडारकर यांना विक्री केल्याची बनावट कागदपत्रे प्रकाशने तयार करून घेतली. २ ऑक्टोबर २००४ रोजी वंदना प्रकाश भांडारकर यांना जमीन विक्री केल्याचे पत्र तयार करण्यात आल्याचे दस्तावेजामध्ये नोंद आहे. २००३ मध्ये जयकृष्णचा कोणताही हिस्सा नाही असे दाखिवले, मग २००४ मध्ये विक्रीपत्र कसे तयार झाले. स्टॅम्प पेपर जयकृष्णच्या नावाने न घेता वंदना भांडारकर यांच्या नावाने घेण्यात आले. स्टॅम्प पेपरवर असलेल्या दोन सह्या वेगवेगळ्या आहेत. तिरोडा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.