गोंदिया : विना परवाना खत विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून दोन लाख रुपयांचा खताचा साठा जप्त केला. ही कारवाई आज गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथे करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार व हेटी (पालेवाडा)ता. गोरेगाव येथील २ व्यक्ती विना परवाना खते विक्री करीत असल्याची माहिती कृषी विभागाला प्राप्त मिळाली होती. त्यानुषंगाने भरारी पथकामार्फत धाड टाकण्यात आली. धाडी मध्ये नोंदणी प्रमाणपत्र न घेता व अनधिकृत जागेतुन खताची विक्री करीत असलेल्या २ आरोपी विरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५,अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५,भा.द.वि.४२०,३४ अन्वये गोरेगाव पोलीस स्टेशन जिल्हा गोंदिया येथे FIR क्रमांक ०४३०/२०२३ २९.०७.२०२३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. विनायक इंडिया बायो फर्टिलायझेर्स प्रा. ली. घटबिलोड जि. धार मध्य प्रदेश या कंपनीचे ५०किलो चे १५० बॅग प्रति बॅग किंमत १२९० प्रमाणे एकूण १९३५००/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही राजेंद्र साबळे विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर, हिंदुराव चौहान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया,एम के मडामे कृषी विकास अधिकारी जि प. गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश रामटेके कृषी अधिकारी पंचायत समिती गोरेगाव यांच्या फिर्यादी वरून करण्यात आली. कार्यवाहीसाठी यसलव बावनकर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गोंदिया, पी डी कुर्वे जिल्हा कृषी अधिकारी जि. प. गोंदिया, श्री अतुल येडे कृषी अधिकारी यांनी सहकार्य केले.