बोंडगाव देवी : तालुक्यातील मागासवर्गीय कर्मचारी, शिक्षक व अधिकारी यांचे विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्यासाठी मंगळवारी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांनी गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी गटविकास अधिकारी साबळे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सातव्या वेतन आयोगान्वये १०, २० व ३० वर्षांच्या सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करणे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन नियमित करणे. शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषद येथे पाठवणे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंशराशी प्रकरणे. सहावे व सातवे वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते जीपीएफमध्ये जमा करणे. उच्च परीक्षेला बसण्याचे अर्ज विनाविलंब जिल्हा परिषद येथे पाठविणे. दुय्यम सेवा पुस्तिका अद्ययावत करणे. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके विनाविलंब जिल्हा परिषद येथे पाठविणे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांचे सेवापुस्तिका सहा महिन्यांच्या आत पेन्शन मंजुरीसाठी जिल्हा परिषद येथे पाठवणे. पशुसंवर्धन व आरोग्य विभागासह सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन व मानधन दर महिन्याच्या १ तारखेस करण्याची कार्यवाही करणे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे नियमित मानधन व अंगणवाडी सेविकांची प्रवास भत्ता देयके नियमित काढणे. मार्च २०२१ चे वेतन १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी करणेसंदर्भाने कार्यवाही करणे. बांधकाम विभागांतील अभियंता यांची प्रवास भत्ता देयके मंजूर करणे. पी. एस. शामकुवर सेवानिवृत्त केंद्रप्रमुख यांचे सातवे वेतन आयोगाची प्रलंबित थकबाकी तातडीने अदा करणे यांसह इतर मागण्यांवर चर्चा करण्यात आली. गटविकास अधिकारी साबळे यांनी या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष भरत वाघमारे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, महासंघाचे आमगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र सांगोंडे, सालेकसा तालुकाध्यक्ष रितेश शहारे, शिक्षक संघटना आमगाव तालुकाध्यक्ष अनिल मेश्राम व कर्मचारी उपस्थित होते.