गोंदिया : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्यासंदर्भात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी (दि. १२) सहायक गटविकास अधिकारी दिलीप खोटेले यांच्यासोबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक झाली. या बैठकीत खोटेले यांनी कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले.
गटशिक्षणाधिकारी जनार्धन राऊत, सहायक प्रशासन अधिकारी एस. बी. गौरकर, आरोग्य विस्तार अधिकारी आर. पी. बोदेले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सातव्या वेतन आयोगान्वये सर्व कर्मचाऱ्यांचे आश्वासन प्रगती योजनाअंतर्गत १०, २० व ३० वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाखांची सुधारित प्रगती योजना १ जानेवारी २०१६ पासून लागू करणेसंदर्भात कारवाई करण्यात यावी, कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन वेळेवर करण्यात यावे, जिल्हा परिषद शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव तसेच सेवापुस्तिका सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत त्वरित पाठविण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन विक्री अंश राशीकरण मंजूर झाल्यानंतर त्वरित देण्यात यावी.
जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे उर्वरित सहावे व सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षकांचे उच्च परीक्षेला बसण्याचे व उत्तीर्ण झाल्याचे कार्योत्तर परवानगी अर्ज, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांच्या सेवानिवृत्ती फाईल्स जिल्हा परिषदेला त्वरित पाठविण्यात यावे. तसेच त्यांच्या अडकून पडलेल्या सेवापुस्तिका संबंधित विभागांना पत्र पाठवून त्वरित मागणी करण्यात यावी. जिल्हा परिषद येथील पत्रान्वये शिक्षकांचे दुय्यम सेवापुस्तक तयार करुन अद्ययावत करण्यात यावे, सर्व विभागातील कर्मचारी, शिक्षक, अधिकाऱ्यांचे मासिक वेतन व सेवानिवृत्तांची पेन्शन दर महिन्याच्या १ तारखेला करण्यासाठी कारवाई करावी, अंगणवाडी सेविकांचे प्रवास भत्ता देयके नियमित व मासिक मानधन नियमित करणे संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी आदी विषय मांडून त्यावर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण गजभिये, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, कर्मचारी महासंघाचे मुख्य संघटन सचिव हितेंद्र रामटेके, उपाध्यक्ष धर्मशिल रामटेके, तालुकाध्यक्ष जितेंद्र बोरकर, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष विरेंद्र भोवते, उत्क्रांत उके, रोशन गजभिये, कर्मचारी ए. आर. नायडू, अर्चना हिवाळे, एस. एम. पारधी उपस्थित होते.