बोंडगावदेवी : जिल्ह्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्यासंदर्भात कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने बुधवारी (दि.१३) जिल्हा परिषद लेखा अधिकारी अशोक बागडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर त्यांनी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरण त्वरित निकाली काढण्यात यावे, सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची प्रलंबित वेतन निश्चिती फाइल त्वरित निकाली काढण्यात यावी, पिंपळगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिरालाल लांडगे यांची पेन्शन विक्री जुलै २०२० मध्ये मंजूर होऊनही आतापर्यंत मिळाली नसल्याने ती त्वरित देण्यात यावी, उमरपायली येथील सहायक शिक्षक तेजराम गेडाम यांची जुलै २०१२ ते ऑक्टोबर २०१३ पर्यंतची कपात भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा करण्यात यावी, पिपरटोला येथील सहायक शिक्षक मनोज गणवीर यांचे सहाव्या वेतन आयोगाचे चार हप्ते भविष्य निर्वाह निधीत जमा करण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी पावती दरवर्षी देण्यात यावी आदी मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन बागडे यांनी दिले. शिष्टमंडळात कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, विरेंद्र भोवते, अजय शहारे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.