बोंडगाव देवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्यासंदर्भात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी (दि.१२) गट विकास अधिकारी राजू वलथरे यांच्यासोबत महासंघाची बैठक झाली. या बैठकीत वलथरे यांनी कास्ट्राईब कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने निकाली काढणार असल्याचे आश्वासन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका किरणापुरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर लोहबरे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल चव्हाण, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्याम लिचडे उपस्थित होते. सर्वप्रथम वलथरे यांना ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान, सातव्या वेतन आयोगान्वे सुधारित प्रगती योजना १ जानेवारी २०१६ पासून लागू करणे, कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन वेळेवर करण्यात यावे, अंगणवाडी सेविकांचे प्रवास भत्ता व बिल त्वरित मंजूर करावे, जिल्हा परिषद शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव तसेच सेवापुस्तिका सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेला त्वरित पाठवाव्या, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन विक्री अंशराशीकरण त्वरित देण्यात यावी,कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रतिकृती देयक व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांची सेवानिवृत्ती वेतन फाईल त्वरित जिल्हा परिषदेला पाठवावी, जिल्हा परिषदेत अडकून पडलेल्या सेवापुस्तिकेची त्वरित मागणी करण्यात यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानधन व कालबद्ध पदोन्नती प्रस्तावांवर कार्यवाही करावी व त्यांचे ४ महिन्यांपासून वेतन झाले नसल्याने त्यावर कार्यवाही करावी. शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खोब्रागडे, अति. सरचिटणीस दिनेश गेडाम, संघटन सचिव विकास बडोले, सचिव धनपाल शहारे, तालुकाध्यक्ष देवदास मेश्राम, शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष राजेश साखरे, जिल्हा संघटिका महासंघ शीला वासनिक, तेजराम गेडाम, सदस्य युवराज वाघमारे, सी.एस.चौधरी, पी.जी.फुलझेले, सुभाष राजगडे, लुटे, डोंगरावर व राऊत उपस्थित होते.
.....
या विषयावर केली चर्चा
पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांचे कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव तसेच सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी सेवापुस्तक जिल्हा परिषदेला पाठवावी, मृत अंगणवाडी मदतनीस स्नेहलता गोपाल लाडे यांच्या वारसदारांना एक रकमी पेन्शन प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी, परिचर सुभाष राजगडे परिचर यांची अतिकालीन मंत्र्यांची राशी त्वरित प्रदान करावी व कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवावे, जिल्हा परिषद पत्रान्वये शिक्षकांचे दुय्यम सेवापुस्तक तयार करुन अद्ययावत करावे, सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांची पेन्शन दर महिन्याच्या १ तारखेला करावी तसेच मासिक वेतन व मानधन नियमित करण्यावर कार्यवाही करण्यात यावी आदी विषयांवर चर्चा झाली.