गोंदिया : भूमिगत गटार योजनेसाठी रस्त्याचे खोदकाम करीत असताना अचानक माती अंगावर पडून त्याखाली कामगार दबून त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी शहरातील मामा चौकात घडली. या घटनेनंतर भूमिगत गटार योजनेचे काम कसे नियमांना धाब्यावर बसवून केले जात आहे. तसेच हे काम करताना कामगारांच्या सुरक्षेसाठी कुठलीच उपाययोजना केली जात नसल्याची बाब देखील पुढे आली आहे. यामुळेच सुरेश जगन नेवारे (४५, रा. गोविंदपूर) या कामगाराचा मृत्यू झाल्याची बाब पुढे आली आहे.
गोंदिया शहरात मागील वर्षभरापासून भूमिगत गटार योजनेचे काम सुरु आहे. हे काम करण्याची जबाबदारी नगर परिषदेची होती; पण नगर परिषदेकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने कंत्राटदाराच्या माध्यमातून व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या यंत्रणेच्या नियंत्रणाखाली हे काम सुरु आहे. भूमिगत गटार योजनेचे काम संपूर्ण शहरात सुरु असून ठिकठिकाणी यासाठी खोदकाम करुन ठेवण्यात आले आहे; पण या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी एमजेपीने केवळ एका अभियंत्यांची नियुक्ती केली असून तोच या कामावर नियंत्रण ठेवत असल्याची माहिती आहे.
भूमिगत गटार योजनेचे काम करताना ज्या ठिकाणी काम करताना त्या ठिकाणी बॅरिकेड्स व काम सुरु असल्याचे फलक लावण्याची गरज आहे तसेच काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे; पण कंत्राटदारांकडून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. तर याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भूमिगत गटार योजनेच्या कामाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झाला आहे.
योजनेच्या कामादरम्यान नाली खचली
शहरात भूमिगत गटार योजनेचे काम करताना केलेले खोदकाम व नालीचे बांधकाम सिमेंटद्वारे केले जात आहे; पण यात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने शहरातील बाजपेयी चौक-पिंडकेपार, खापर्डे कॉलनी, पांगोली रोड, मनोहर चौक, राजाभोज काॅलनी, गजानन मंदिरासमोरील नवीन बांधकाम केलेली नाली खचली. याची तक्रार सुद्धा संबंधित विभागाकडे करण्यात आली.
गटार योजनेचे चेंबर उघडे
भूमिगत गटार योजनेचे काम करताना काही ठिकाणी चेंबर तयार केले जात आहे; पण काही भागात रस्त्यापेक्षा चेंबर वर असल्याने रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. तर या चेंबरमुळे तीन चार अपघात झाले आहेत; पण यानंतरही कंत्राटदाराने याची मुळीच दखल घेतली नसून नियंत्रणाची जबाबदारी असलेला विभाग सुद्धा कंत्राटदारांच्या चुकांवर पांघरुण घालण्याचे काम करीत असल्याचे चित्र आहे.
तक्रारींचा पाऊस पण दखल घेणार कोण
शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम कोट्यवधी रुपयांचे आहे. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून याची शहर युवक काँग्रेस व नागरिकांनी नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे तक्रार केली होती; पण याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या योजनेच्या कामातील अनियमितता वाढत चालली असून त्यातूनच एका कामगाराला आपला जीव गमवावा लागला.