गोंदिया : तिरोडा तालुक्यातील चुरडी येथील बिसेन परिवारातील चौघांची निर्घृणपणे केलेल्या हत्येचा तपास वेगाने करून या प्रकरणातील आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत पोलीस विभागाने स्वस्थ बसू नये. झालेला प्रकार केवळ गोंदिया जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी निंदनीय व चीड आणणारा असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी म्हटले आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. राज्यात बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सत्ता पक्ष असो वा प्रमुख विरोधी पक्ष असो, एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करण्यात मग्न आहेत. मात्र, मुख्य विषय बाजुला पडत आहे. धाक नावाचा प्रकार उरलाच नसून, सूडबुद्धीने प्रेरित राजकारण्यांना वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळेच चुरडीसारखी घटना असो वा महिलांवरचे अत्याचार, याचे सोयरसुतक राहिलेले नाही. चुरडी प्रकरणाचा वेगाने तपास करून संबंधित सर्व आरोपींना पकडून जलदगती न्यायालयात खटला दाखल करून आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत गृह विभागाने मोकळा श्वास घेऊ नये, अशी मागणी हेमंत गडकरी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.