सडक-अर्जुनी : शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी विविध व्यसनांच्या आहारी जात आहेत. याला वेळीच जर आवर घातला नाही, तर याचे भयंकर परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत शिक्षक व पालकांची जबाबदारी आणखीच वाढते. कॅन्सरसारखा रोग अतिव्यसन, फास्टफूडचे सेवन व व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे जडतो. याचे समुपदेशन पालक सभेमार्फत विद्यार्थी व पालकांदरम्यान होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य खुशाल कटरे यांनी केले.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदेशानुसार कॅन्सर स्टाॅप मिशन ऑर्गनायझेशनच्या वतीने आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मुख्य मार्गदर्शक कॅन्सर स्टाॅप ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधी अजय ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डव्वा केंद्राचे केंद्रप्रमुख एस.सी. सिंगनजुडे, सचिन हायस्कूल व उमावि (पाटेकुर्रा) प्राचार्य डी.एल. मेश्राम, पर्यवेक्षक जे.एस. लंजे उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रप्रमुख सिंगनजुडे यांनी मांडले. संचालन करून आभार सहायक शिक्षक जी.टी. लंजे यांनी मानले. दोनदिवसीय कार्यशाळेत पंचायत समितीअंतर्गत सर्व व्यवस्थापनाद्वारे संचालित शाळांचे शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते.