गोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच आता शाळांमध्ये सुध्दा कोरोनाची एन्ट्री झाली असून १२ शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग बघता १५ दिवसांसाठी इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याबाबत शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने मंथन सुरु केले आहे.
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर शासनाने इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरू होऊन आता पाच महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र मार्च महिन्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढीला सुरुवात झाली आहे. मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच शाळांमध्ये देखील कोरोनाने एन्ट्री केल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १, देवरी १, गोंदिया ९ आणि तिरोडा तालुक्यातील १ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सध्या विद्यार्थी आणि शिक्षण विभागातर्फे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यात तपासणी दरम्यान विद्यार्थी कोरोना बाधित आढळले. त्यामुळे शाळांमध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे. कोरोना बाधित विद्यार्थी आढळलेल्या शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
..............
१५ दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यातच आता शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा १५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात याव्या असा प्रस्ताव शिक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. यावर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
..............
कोट
जिल्ह्यातील १२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल प्राप्त होताच शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता १५ दिवस शाळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी प्राथमिक
...........