लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दीड महिन्यात खालावलेला कोरोना बाधितांचा आलेख मागील आठवडाभरापासून वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत असून बुधवारी (दि.२५) जिल्ह्यात १३३ नवीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा ११९०९ वर पोहचला असून कोरोनाची बारा हजारी वाटचाल सुरु झाल्याने जिल्हावासीयांना वेळीच सावध होण्याची गरज आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु झाल्याने शिक्षकांना कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कोरोना चाचणी केंद्रावर सर्वाधिक शिक्षकांचे स्वॅब नमुने तपासणी केले जात आहे. त्यामुळे सुध्दा रुग्ण संख्येत थोडी वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४० शिक्षक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. बुधवारी जिल्ह्यात १३३ कोरोना बाधित आढळले. यात सर्वाधिक ७७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६, गोरेगाव ४, आमगाव १२, सालेकसा १, देवरी २, सडक अर्जुनी ८, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २३ कोरोना बाधितांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८१०१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी ३५५५४ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ४७९१४ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४२९२१ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११९०९ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १०७३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात १०१९ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण असून २१६४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. तर १५४ कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर ८९.०५ टक्के जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.०५ टक्के असल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा सुध्दा मिळाला आहे. रुग्ण वाढीचा डब्लिंग रेट १२१ दिवसावर गेला आहे. तर मृत्यू दर १.१९ टक्के आहे.