गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची नोंद झाली असून आता सर्वच तालुक्यात कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४९७ वर पोहचली आहे. गोंदिया तालुक्यात सर्वाधिक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून हा तालुका कोरोनाचा हॉटस्पाॅट बनला आहे.
जिल्ह्यात सोमवारी (दि. २२) ५७ कोरोना बाधितांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक ४१ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. गोरेगाव ७, देवरी २, सडक अर्जुनी ३, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. मधल्या काळात चार तालुके कोरोनामुक्त होते. पण आता या तालुक्यांमध्येसुध्दा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस फुगत आहे. याला वेळीच प्रतिबंध लावला नाही तर कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सुध्दा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा कोरोना संसर्गात अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ९५६२७ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८३१८९ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली जात असून यातंर्गत ८११२२ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ७४७१९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५१४४ कोरोना बाधित आढळले असून त्यापैकी १४४६० बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ४९७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १२९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
......
आतापर्यंत ५१७१८ जणांना कोरोनाची लस
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी कोरोना लसीकरण सुरु असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५१७१८ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर ६७३२ जणांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५१ लसीकरण केंद्रावरून सध्या कोविड लसीकरण सुरु आहे.
.............
गोंदिया तालुका झाला कोरोनाचा हॉटस्पाॅट
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण गोंदिया तालुक्यात आहेत. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने या तालुक्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २८७ वर पोहचली आहे. त्यामुळे हा तालुका कोरोनाचा हॉटस्पाॅट झाला आहे.
....