जि.प. सभागृहातील प्रकार : सभापतीवर अॅट्रॉसिटीचा तर सहा सदस्यांवर मारहाणीचा गुन्हा गोंदिया : सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत असंवैधानिक भाषेवरुन उठलेल्या वादात शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांना मारहाण करण्यात आली. या संदर्भात राष्ट्रवादीच्या सहा जि.प. सदस्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांच्यावर अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही बाजुने परस्परांविरूद्ध तक्रारी केल्या असल्या तरी नेमका प्रकार काय घडला याची तपासणी सीसीटीव्ही फुटेजमधूनच केली जाणार आहे. जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा सुरु असताना या संदर्भात झालेल्या मारहाणीप्रकरणी शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्यांच्या उपस्थितीत जि.प.सदस्य कैलास पटले यांनी जि.प.च्या कारभाराबद्दल आक्षेपार्ह शब्दाप्रयोग केला. यावरुन पटले यांनी सभागृहाची माफी मागावी असे अध्यक्षांनी म्हटले. कसेबसे हे प्रकरण निवळत असताना जेवनानंतर पुन्हा माफीच्या मुद्द्यावरून वातावरण गरम झाले. विरोधकांनी बहिष्कार टाकत सभागृह सोडले. यावेळी सुनीता मडावी यांनी व्यासपीठावर चढून कॉडलेस माईक पी.जी.कटरे यांच्या अंगावर फेकून मारला असा त्यांच्यावर आरोप केला आहे. यावेळी काचेच्या ग्लासने मारण्याचा प्रयत्न केला, पण तो अडवताना हाताला दुखापत झाली, असा आरोप कटरे यांनी केला आहे. या प्रकरणात जि.प.चे १५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमुद करण्यात आले. विरोधी सदस्यांनी चिथावनी दिल्याने त्यांच्यावर भादंविच्या कलम ३२४, ३५५, ४२७, १०९, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे जि.प. सदस्य सुनीता सुधाकर मडावी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी.कटरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगावच्या इमारती दुरुस्ती कामाबद्दल प्रशासकीय पत्राच्या झेरॉक्स कटरे यांना दाखवित ते परत घ्या, मला नाही पाहिजे, असे बोलले असता टेबलावर पाण्याने भरलेला काचेचा ग्लास पी.जी.कटरे यांनी फेकून मारला. त्यामुळे आपल्या बोटाला दुखापत झाली. इतकेच नव्हे तर जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार मडावी यांनी केली आहे. त्यामुळे कटरेंविरुद्ध कलम ३२४ सहकलम ३ (१), ३(२), (५), (१), अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. चार कॅमेऱ्यांची तपासात मदत जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात ४ सी.सी. टीवी कॅमेरे लावण्यात आले आहेत. अध्यक्ष व सर्व सभापती ज्या मंचावर बसतात त्या ठिकाणी एक सी.सी.टीवी कॅमेरा व स्टेजच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी १ तर मंचाच्या विरुद्ध बाजूला १ असे चार सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यामुळे सभागृहातील प्रत्येक हालचाली टिपल्या जातात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या कथित मारहाणीची सत्यता पोलीस तपासताना हे सी.सी. टीवी कॅमेरे मदत करणार आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमधून होणार मारहाणीचा उलगडा
By admin | Published: April 05, 2017 1:00 AM