देवरी: कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर पुन्हा एकदा बंधने राहणार आहेत. सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करताना गणेश मंडळांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या शासनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करूनच यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी केले.
पोलीस स्टेशन देवरीच्या प्रांगणात सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील आणि पोलीस अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता मंडळाने घ्यावी. तसेच श्रीचे आगमन व विसर्जनाच्या वेळी मिरवणूक काढू नये. प्रत्येक मंडळाने शहरातील नगरपंचायत, ग्रामपंचायत, वीज महावितरण आणि इतर स्वराज्य संस्थांची रितसर परवानगी काढावी. शासनाच्या आदेशानुसार कोणत्याही परिस्थितीत डीजेला परवानगी मिळणार नाही. कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. यावेळी बनकर यांनी प्रामुख्याने सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्ती ही चार फूट आणि घरगुती गणेश मूर्ती २ फुटापेक्षा मोठी नसावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी बैठकीत देवरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, सहायक पोलीस निरीक्षक घाटगे प्रामुख्याने उपस्थित होते.