गोंदिया : होळी हा सण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी २८ मार्च रोजी होळीचा सण आहे. गोंदिया व लगतच्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करून हा सण अतिशय साधेपणाने साजरा करावा, असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी कळविले आहे.
कोविड-१९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच मोठ्या स्वरूपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. २९ मार्च रोजी धूलिवंदन हे सण साजरे करण्यात येणार आहेत. दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते; परंतु कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करणे आवश्यक आहे. होळी, धूलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. जिल्हास्तरावर यापूर्वी शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार वेळोवेळी सुधारणेसह निर्गमित करण्यात आलेले आदेश व जिल्हास्तरावर निर्बंध घातलेले सर्व आदेश लागू राहतील. कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल विभाग, आरोग्य विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगर पंचायत, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी सदर परिपत्रक अन्वये कार्यवाही करावी. या आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.