शैलेंद्र लेंडे : जगत महाविद्यालयातील राष्ट्रीय चर्चासत्र गोरेगाव : जागतिकीकरणात मानवी जीवनाच्या उत्थानाचे केंद्रबिंदू मराठी लोकनाट्यात सामावले आहे, त्याकरिता जागतिकीकरणात मराठी लोकनाट्याचा वारसा टिकवून ठेवणे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे, असे प्रतिपादन रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे पदव्युत्तर मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले. अशाप्रकारे मौलिक विचार व्यक्त केले. बहुजन हिताय जगत शिक्षण संस्थाद्वारा संचालित जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत मराठी विभागांतर्गत ‘जागतिकीकरण आणि मराठी लोकनाट्य’ या विषयावर आधारीत राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संस्थाध्यक्ष जगतराम रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव नारायण येळे होते. बिजभाषक म्हणून सुप्रसिध्द साहित्यीक डॉ. हरिश्चंद्र बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पोहरकर, प्राचार्य डॉ. नीलकंठ लंजे, उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम, मराठी विभागप्रमुख डॉ.चंद्रकुमार राहुले उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून येळे यांनी, जगाचे अस्तित्व कलेवर अवलंबून आहे त्यामुळे कलेला जीवंत ठेवण्याकरीता अशा चर्चासत्राची नितांत गरज असल्याचे विचार व्यक्त केले. चर्चासत्राच्या प्रथम सत्रात प्रमुख वक्ते म्हणून विद्याभारती महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख, डॉ. नरेंद्र आरेकर व एस.एस.जे.महाविद्यालयाचे प्रा.डॉ.शरद मेश्राम यांनी वरील विषयावर विचार व्यक्त केले. तर मराठीतील लोककला प्रकार या विषयावरील चर्चासत्राचे प्रमुख वक्ते म्हणून कला, वाणिज्य व. विज्ञान महाविद्यालय, कोराडीचे प्रा.डॉ. राजेंद्र वाटाणे व संताजी महाविद्यालय, पालांदूरचे प्रा.संजय निबेंकर यांनी विचार व्यक्त केले. या दोन्ही सत्राचे अध्यक्षस्थान एम.बी.पटेल महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अनिल नितनवरे यांनी भूषविले. सुप्रसिध्द साहित्यीक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी बिज भाषण केले. चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुप्रसिध्द साहित्यीक हिरामण लांजे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द साहित्यीक ओमप्रकाश शिव, प्राचार्य डॉ. नीलकंठ लंजे, उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम, मराठी विभाग प्रमुख डॉ. चंद्रकुमार राहुले विचारमंचावर उपस्थित होते. हिरामण लांजे यांनी मार्गदर्शन करताना प्राचीन काळापासून तर आजतागायत खरी लोकशिक्षणाची भूमिका लोकनाट्यांनी पार पाडली आहे. समाजप्रबोधनाचे खरे माध्यम म्हणून लोकनाट्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, अशाप्रकारचे मौलिक विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.चंद्रकुमार राहुले यांनी मांडले. संचालन डॉ.सी.एस.राणे व डॉ. रविप्रकार चंद्रिकापुरे यांनी केले. आभार डॉ.सी.टी.राहुले, डॉ.सी.एस.राण यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
मानवी जीवनाच्या उत्थानाचे केंद्रबिंदू मराठी लोकनाट्यात
By admin | Published: April 05, 2017 1:05 AM