केशोरी : येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेतील एटीएम मशीन तांत्रिक अडचणीमुळे गेल्या १५ दिवसांपासून बंद पडली आहे. यामुळे ग्राहकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एटीएम मशीन त्वरित दुरुस्त करण्याची मागणी खातेदारांनी केली आहे.
यांत्रिकी युगामुळे कोणत्याही बँकेतील खात्यामधून एटीएमद्वारे रक्कम काढण्याची सुलभ व्यवस्था झाली आहे. यामुळे बँकेत खातेदारांची गर्दी होण्यावर नियंत्रण आले असून एटीएमच्या माध्यमातून आवश्यक तेवढी रक्कम काढता यावी यासाठी येथील जिल्हा बँक शाखेत एटीएमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या एटीएमकरता भारत दूरसंचार निगमची कनेक्टिव्हिटी करण्यात आली होती. परंतु ती सेवा वेळोवेळी खंडित होत असल्याने ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून जीओ या कंपनीशी करार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
परंतु प्रक्रियेमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून येथील एटीएमचे शटर बंद आहे. ग्राहकांनी अनेकदा विचारणा केली परंतु त्या संदर्भात ग्राहकांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. जिल्हा बँक व्यवस्थापक सुरेश टेटे यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी संयुक्तिक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तर देऊन एटीएम दुरुस्ती करण्यासंबंधी हात वर केले. या बाबीची दखल घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने विशेष लक्ष देऊन येथील एटीएम त्वरित दुरुस्त करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.