गोंदिया : पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महागाई दहापट वाढली असून, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशात हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. महागाई आकाशाला भिडलेली असताना केंद्र सरकारने मनरेगाच्या मजुरीत केवळ ८ रुपयांनी वाढ करून मजुरांची एकप्रकारे थट्टाच केली आहे.
रोजगार हमी योजनेच्या मजुरीत केवळ ८ रुपयांची दरवाढ करण्यात आली असून, एप्रिलपासून मजुरांना २५६ रुपये मजुरी मिळणार आहे. मजुरांच्या हाताला काम मिळावे व त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी शासनाने रोजगार हमी योजना सुरु केली. मजुरांना होणारे फायदे लक्षात घेता, ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आली.
या योजनेत अनेक प्रकारचे लाभ शेतकरी घेऊ शकतात. मजुरीची रक्कम लाभार्थी व मजुरांच्या बँक खात्यात जमा होते. शेततळे व फळबाग लागवड हे घटक शेतीतून स्थिर उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात मजुरांच्या हाताला काम मिळावे व सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी रोहयो अंतर्गत विविध योजना गाव पातळीवर राबविल्या जातात. माती नाला, बांध यासारखी कष्टाची कामे मजुराला करावी लागतात.
जिल्ह्यात ३ हजार कामे सुरु
२०२१-२२ या वर्षात २४८ रुपये मजुरी मिळत होती. आता त्यात आठ रुपयांनी वाढ केल्याने २५६ रुपये मजुरी दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यात ३ हजारांच्यावर कामे सुरु आहेत.
ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या रोजगार हमी योजनेच्या मजुरीत गेल्यावर्षी अत्यल्प वाढ करण्यात आली होती. यंदा राज्यातील दुष्काळी स्थिती, वाढत्या महागाईचा विचार होऊन मजुरीत वाढ होईल, असे अपेक्षित होते. मात्र, केवळ आठ रुपयांची वाढ करून सरकारने मजुरांची थट्टा केली आहे.
- हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष, आयटक