गोंदिया : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा गोंदिया जिल्हा व शहर युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि.९) प्रतिकात्मक शवयात्रा काढून व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. मुंडण केलेले केस पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्याचा संकल्प केला.
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये सातत्याने दरवाढ केली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. जनतेला मोठी आणि खोटी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा आता खरा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे. याचा निषेध नोंदवित जिल्हा युवक काँग्रेसच्या मार्गदर्शनात तालुका विधानसभा, शहर युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दुपारी १२ वाजता स्थानिक शहीद भोला काँग्रेस भवन येथून प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात आली. यानंतर ही प्रतिकात्मक शवयात्रा जयस्तंभ चौकात पोहचली. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी व निदर्शने केली. तसेच केंद्र सरकारच्या धोरणाचा मुंडण करून निषेध नोंदविला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. नामदेव किसान, काँग्रेस प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष जहीर अहमद, गोंदिया जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अलोक मोहंती, अध्यक्ष हरीश तुळसकर,माजी आमदार दिलीप बन्सोड, युवक नेते अशोक गुप्ता, तालुका काँग्रेस अध्यक्ष सूर्यप्रकाश भगत, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबा बागडे, शहर अध्यक्ष रवी चौरसिया, जिल्हा उपाध्यक्ष अजहर खान, शहर अध्यक्ष शेख, तालुका अध्यक्ष शैलेश भिसे, जिल्हा उपाध्यक्ष कीर्ती येरणे, मंगल नंदेश्वर, राहुल खाडे, योगेश उके, दीपेश अरोरा, वारिस भगत, अभिषेक जैन, नीलम हलमारे, ओबीसीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे, राजकुमार पटले, पंकज राजकुमार बागडे, रवी चौरसिया, शैलेश बिसेन आदी यात सहभागी झाले होते.
............
दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन
डिझेल व पेट्रोलच्या वाढलेल्या किमती, खाद्यतेल व गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करीत शवयात्रा काढण्यात आली. युवा कार्यकर्ता जनक फुंडे यांनी मुंडण करून आपले केस नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पाठविणार आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची किमती कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिला.