गोंदिया: रस्ते अपघातानंतर लोकांच्या रोषाला घाबरून पळून जाणाऱ्या जड वाहनचालकांविरुद्ध संसदेत पारित झालेल्या कठोर विधेयकाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. १) दुपारी १ वाजता गोंदिया-बालाघाट मार्गावरील आंबेडकर चौक येथे वाहनचालक परिचालक संघाच्या नेतृत्वात मोटारचालकांसह वाहतूकदारांनी ‘चक्का जाम’ आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो वाहनचालक व वाहतूकदार सहभागी झाले होते. नववर्षाच्या पहिल्याच दिवसाची सुरुवात वाहनचालकांच्या आंदोलनाने झाली. या आंदोलनामुळे आंबेडकर चौकात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता संसदेत मोदी सरकारने नवीन विधेयक मंजूर करून घेतले आहे. रस्त्यावर अपघात घडल्यानंतर जड वाहनांचे चालक जखमींची मदत करण्यासाठी न थांबता पळून जातात. अशा चालकाविरुद्ध नवीन कायद्यानुसार दाखल होणाऱ्या खटल्यात दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा होण्याची तरतूद आहे. वास्तविक पाहता अशा अनेक अपघातांमध्ये वाहनचालक झुंडीच्या हल्ल्यामुळे घाबरून पळून जातात.
पळून जाणे हा त्यांचा दोष असू शकत नाही, तर ती अपरिहार्यता असते. तसेच जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था फारच बिकट असल्याने वाहन अपघातात वाढ झाली आहे. तर नवीन कायद्यानुसार अपघात झाल्यास वाहनचालकाला १० वर्षांची शिक्षा व ७ लाख रुपयांचा दंड होणार आहे. चार पाच हजार रुपये महिन्याने काम करणारा वाहनचालक दंडाची रक्कम भरणार कुठून, असा सवाल वाहनचालक परिचालक संघटनेने केला आहे.
वाहनचालकाला १० वर्षांची शिक्षा झाली तर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार, अपघात झाल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार न होता अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करावे, असे म्हटले; पण घटनास्थळवर जमावाने चालकाला मारहाण केल्यानंतर त्याचा जीव गेल्यास त्याची हमी कोण घेणार, असा सवालदेखील उपस्थित केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा नवीन कायदा त्वरित रद्द करावा, अशी मागणी वाहनचालक परिचालक संघ, ट्रक ड्रायव्हर वेलफेअर असोसिएशन, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
टायरची केली जाळपोळ
वाहनचालकांनी केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक कायद्याचा सोमवारी रस्त्यावर उतरून विरोध केला. शहरातील रामनगर, बालाघाट टी पाॅइंट, जयस्तंभ चाैक येथे टायरची जाळपोळ केली आहे. यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती आहे.
पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगावाहनचालकांनी साेमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात ट्रक, काळी-पिवळी चालक, ऑटो चालक, टँकरचालक व खासगी वाहन चालकसुद्धा सहभागी झाले आहेत. हे आंदोलन किती दिवस चालेल याची माहिती नाही. त्यामुळे पेट्रोल मिळणार की नाही या भीतीने वाहनचालकांनी शहरातील सर्वच पेट्रोलपंपांवर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
प्रवाशांची गैरसोय
वाहनचालकांनी पुकारलेल्या आंदोलनात सोमवारी काळी-पिवळी चालक, ऑटोचालक, ट्रॅव्हल्स चालक सहभागी झाल्याने बाहेरगावी जाणाऱ्या आणि रेल्वेस्थानकावरून शहरात जाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागला, तर ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांनासुद्धा याचा फटका बसला.