वज्राघात : नशिबी आले खडतर जीणे, बाक्टी-चान्ना येथील कुटुंबाची व्यथा अमरचंद ठवरे बोंडगावदेवीकौटुंबिक जीवन जगत असताना संसाररुपी गाड्याची दोन्ही चाके शेवटपर्यंत सोबतीला राहुन एकमेकांच्या सुख-दु:खात सामील झाले तरच संसाराचा गाडा निटनेटका चालतो असे म्हणतात. मुलांचे भविष्य घडवीत असताना ऐकाएकी दृष्ट लागून अर्ध्यावरच गाडा मोडला तर त्या कुटूंबावर मोठा वज्राघात होतो. असाच वज्राघात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी-चान्ना येथील एका कुटुंबावर झाला.तीन-चार महिन्याच्या फरकाने दोघाही पती-पत्नीचे निधन झाल्याने अल्पवयीन असलेल्या दोघा-बहीण भावावर अनाथ होण्याची वेळ आली. बाक्टी-चान्ना येथील स्नेहा (१४), विराज (८) या दोन भावडांवरून मात्यापित्याचे छत्र हरवल्याने त्यांच्या नशिबी खडतर जगणे आले. बाक्टी-चान्ना येथील दिनेश भजनदास मेश्राम (५२) हे ८० वर्षीय आई, पत्नी रंजना (४५), मुलगी स्नेहा (१४), मुुलगा विराज (८) आपल्या लहान कुटूंबासहीत मोलमजूरी करून सुखी जिवन जगत होता. काही वर्षाने पत्नीच्या प्रकृतीमध्ये बिघाड आला. प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी दिनेशने शर्तीचे प्रयत्न केले. पाऊन एकर शेतजमीनीची मशागत व इतर मोलमजूरी करून तो आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवित होता. यावर्षीच्या जून महिन्यात कामानिमित्त सायकलने अर्जुनी-मोरगावला जात असताना चान्ना रस्त्यावरच उष्माघाताने दिनेशची २ जून २०१६ रोजी प्राणज्योत मालवली. पूर्वीचीच प्रकृती स्वास्थानी सुखी-दुखी राहणारी त्याची पत्नी रंजना हिच्यावर मोठा आघात झाला. शरीर स्वास्थाने सुदृढ असून सुध्दा एकाएकी पतीचे निघून जाणे तिच्यावर जबर हादरा बसला. पतीच्या निधनाचे दु:ख असहाय्य होऊन रंजना पतीच्या निधनानंतर तीन महिन्यातच मृत्यू पावली. तीन-चार महिन्याच्या कालावधीत आई-वडीलाचे निधन झाल्याने अल्पवयीन असलेल्या दोघा बहीण भावावर अनाथ होण्याची पाळी आली. मुलगी स्नेहा १४ वर्ष १ महिन्याची आहे. ती इयत्ता ९ वी मध्ये शिकत आहे. मुलगा विराज हा ८ वर्ष ४ महिन्याचा असून इयत्ता ३ री मध्ये शिकत आहे. एकाएकी मायेची उब देणाऱ्या माय-बापाची खेळण्या बाळगण्याच्या वयामध्ये सावली विझल्याने त्या दोघा भावांच्या नशिबी खडतर जिवन जगण्याची वेळ आली आहे. जन्मदात्याचे छत्र हरवल्याने सध्या दोघेही बहीणभाऊ वार्धक्याचे जीवन जगत आहेत. सेबतीला ८० वर्षीय आजी प्रभावती भजनदास मेश्राम यांच्या सहाय्याने काटेरी जीवन जगत आहेत. मुलाबाळांचे जीवन घडविण्यामध्ये जन्मदात्यांची महत्वाची भूमिका असते. अवघ्या बालवयातच मायबापांचे छत्र हरपल्याने स्नेहा, विराज या भावंडाचे जीवन एक आव्हाणात्मक ठरत आहे.जीवनाच्या वाटेवर मार्गक्रमण करीत असतानी बापाची नाही तर मायेची साथ मिळणे अति गरजेचे असते. जन्मदात्यांची बालवयामध्ये साथ तुटल्याने त्या अनाथ दोन भावंडाच्या खडतर जीवनक्रमात अग्निदिव्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठी मुलगी स्नेहा ही चान्ना-बाक्टी येथील मिलींद विद्यालयात तर विराज हा बाक्टी येथील जि.प.व प्राथ. शाळेत विद्यार्जन करीत आहे. सामान्य मोलमजूरी करून मायबापांनी आपल्या हयातीत या भावंडाची ईच्छापूर्ती केली. परंतु आज जन्मदात्याचा आधारच हिरावून गेल्याने त्या दोन भावंडावर मोठा आघात झाला आहे.-या अनाथांना नाथाची गरज ऐन खेळण्या-बाळगण्याच्या वयामध्ये अनाथ झालेले स्नेहा, विराज या दोन भावंडाना काटेरी वेलीवरचे जीवन मार्गक्रमण करण्यासाठी ममतेची पाठ थोपाटणाऱ्या समाजातील खऱ्या नाथाची गरज आहे. सदोनित हास्य असणाऱ्या चेहऱ्यावर जन्मदाते सोडून गेल्याचे दु:खाश्रृ त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते. मायबापाविना पोरक्या झालेल्या अल्पवयीन बहीण-भावांना दिलासा, सहानुभूती देण्यासाठी अजून पावेतो, नाथानी त्यांच्या झोपडीवजा घराकडे कुणीही आले नसल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्य करण्याचा गवगवा करणारे मात्र अशावेळी पुढे येतानी दिसत नाही. पालकत्व स्विकारण्यासाठी पुढे कोण येणार ? अल्पवयात एकाएकी मायबापांचे कृपा छत्र हरवलेल्या स्नेहा, विराज या दोन भावंडाना आधार देऊन पालकत्व स्विकारण्यासाठी सामाजिक दानदात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्या दोघा भावांना धिर देण्यासाठी अजून पावेतो कुणीही समोर आला नाही. बाक्टी येथील जि.प.प्राथ.शाळेचे शिक्षक कैलास हांडगे, मोटघरे, मीना लिचडे, छाया मदने यांनी शैक्षणिक खर्चाची (७वीपर्यंत) जबाबदारी उचलण्याचा माणस त्या शिक्षकांनी व्यक्त केला. मायबापाचे कृपाछत्र हरवलेल्या अनाथ झालेल्या दोघा भावंडाना मदतीचा हात देऊन पालकत्व स्विकारण्याची गरज आहे. समाज धुरीणानी पुढे आल्यास निश्चितच जन्मदात्याचे दु:ख सावरून त्या बालकांवर हास्य फुलू शकते.
चिमुकल्यांचे हिरावले छत्र
By admin | Published: September 25, 2016 2:30 AM