नवेगावबांध : जिल्ह्यात १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले असून त्यांनी खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाने कळविले आहे.
अर्जुनी- मोरगाव तालुक्यात सध्या हरभरा, लाखोळी व जवस ही पिके पक्वतेच्या अवस्थेत आहेत. ज्या ठिकाणी पिकांची काढणी करण्यात आली असेल ती पिके काढणीनंतर त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावी. जेणेकरून त्यांचे अवेळी पावसापासून नुकसान होणार नाही. तसेच ज्या ठिकाणी खरीप हंगामातील उत्पादित झालेला धान उघड्यावर असेल, तो पावसाने भिजण्याची शक्यता आहे. त्याला त्वरित ताडपत्रीचे आच्छादन करण्यात यावे, असे प्रभारी तालुका कृषी अधिकारी कुमुदिनी बोरकर यांनी कळविले आहे.