गावागावातील हातपंप नादुरुस्त
गोंदिया : जिल्ह्यातील गावागावात असलेले बहुतांश हातपंप नादुरुस्त असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईत आणखी भर पडत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहेत. मात्र, ते नादुरुस्त असल्याने अडचणी वाढल्या आहेत.
शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा
नवेगावबांध : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुण पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचा विचार करता पोलीस भरतीसाठीची वयोमर्यादा ३३ वर्षांवरून ३५ वर्ष करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांनी केली आहे.
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला
सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, यामुळे रुग्णांमध्ये वाढ झाली आहेे. त्यामुळे बोगस डॉक्टरांची मात्र चांदी झाली आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा
तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र, याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.
ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
देवरी : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पारंपरिक झाडू व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत.
विश्रामगृह तयार करण्याची मागणी
केशोरी : जिल्ह्यावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी, आमदार, खासदार येथे येतात. त्यामुळे त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.
निराधारांचे अनुदान त्वरित द्या
शेंडा कोयलारी : परिसरातील निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील ३-४ महिन्यांपासून अनुदान जमा झालेले नाही. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत असून, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक
आमगाव : तालुक्यातील अनेक ठिकाणी महावितरणचे डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. या उघड्या डीपीमधूनच वीजपुरवठा होत आहे. त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली असली तरी महावितरणकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
राईस मील ठरत आहेत धोकादायक
गोरेगाव : राज्य मार्गावर असलेल्या राईस मीलमुळे वाहनचालकांच्या डोळ्यात धानाचा कोंडा उडत आहे. त्यामुळे डोळ्यात कचरा जाऊन अपघात होण्याची शक्यता असते.
डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त
गोंदिया : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी
अर्जुनी-मोरगाव : सांडपाण्याचा निचरा होत नाही, पण तरीही नगर पंचायत प्रशासनाचे नाले स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. नाले केरकचऱ्याने भरले आहेत. त्यामुळे त्यातून सांडपाण्याचा निचरा होत नाही.
कचरापेट्यांकडे दुर्लक्ष
केशोरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये, यासाठी चौकाचौकांमध्ये कचरापेट्या बसविण्यात आल्या. मात्र, या कचरापेट्यांची नियमित सफाई होत नाही.