तिरोडा : तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज चोरी होत असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. तालुक्यात रेती, मुरूम, गिट्टी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून व मोठ्या प्रमाणात रस्त्याचे, घराचे, सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तालुक्यातील चांदोरी बुज. रेती घाटातून अवैधरीत्या रेती उत्खनन सुरू आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाची डोळेझाक झाली असल्याने रेतीमाफियांना अभय दिले जात असल्याचे चित्र आहे.
चांदोरी खुर्द रेती घाटाची क्षमता केवळ २५०० ब्रास इतकी आहे. मात्र, या घाटातून मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या साहाय्याने अवैध उत्खनन केले जात आहे. यामुळे गावकऱ्यांनी हे रेती घाट बंद करण्याची माणगी केली आहे. रेती घाटाची रायल्टी जिल्हास्तरावरून दिली जाते. याची माहिती उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना नसल्याने रेतीची उचल किती याची माहिती नसल्याने घाटाचे कंत्राटदार हे विना परवाना प्राप्त रेतीची वाहतूक करून रायल्टी (परवाने) वाचविण्याचे कार्य करीत आहे. तसेच रायल्टी संपलेली असली तरी घाटातून रेतीचा उपसा करण्यात येत आहे. रेती चोरीच्या घटना समोर येऊ नये म्हणून पाण्याचे पात्र असलेल्या ठिकाणी जेसीबीचा वापर करण्यात येत आहे. नियम धाब्यावर बसवून रात्रीला देखील रेतीचा उपसा तर केला जात आहे. जिल्हा प्रशासन आणि खनिकर्म अधिकारी यांचे संगनमताशिवाय हे उत्खनन करणे शक्य नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
.............
उत्खनन केलेल्या क्षेत्राची चौकशी करा
जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना जमाव करून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. हे गावकऱ्यांनी उघड केले आहे. याची रीतसर तक्रार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि जिल्हाधिकारी यांना करण्यात आली असून कंत्राटदाराने खोदकाम केलेल्या क्षेत्राची चौकशी करून घाट बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.