अकार्यक्षम पदवीधर शिक्षक : १० जुलैला शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारागोंदिया : जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आहेत. मात्र शिक्षकच व्यसनांच्या आहारी गेले असतील ते विद्यार्थ्यांना कसे संस्कारित करतील? व्यसनी शिक्षकांना पाहूनच विद्यार्थ्यांमध्येही व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी किंवा त्यांचे स्थानांतरण करण्यात यावे, असा सूर ऐकू येत आहे. असाच एक प्रकार तिरोडा तालुक्यातील अर्जुनी येथे घडला असून व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी ‘त्या’ शिक्षकाच्या बदलीची मागणी केली आहे.अर्जुनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षणाचे धडे न देता कार्यालयात बसून शासकीय वेतनाचा लाभ घेणे, या संदर्भाची तक्रार वरिष्ठांना करण्यात आली असून त्यावर काहीच कारवाई झाली नाही. या प्रकरणाचा शालेय व्यवस्थापन समितीने ३० जूनला पालक सभा करून ठराव घेतला. त्या जर सदर पदवीधर शिक्षकाचे स्थानांतरण झाले नाही तर १० जुलैला शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, अर्जुनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पदविधर शिक्षक सी.डब्ल्यु. खोब्रागडे १ सप्टेंबर २००४ पासून रुजू आहेत. एकंदरीत १२ वर्षांचा त्यांचा कार्यकाल एकाच शाळेत असून दारूची नशा करून उलट्या करून विद्यार्थ्यांच्या हातून सफाई करायला लावतात, अशी तक्रार ग्रामस्थांची आहे. या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी विभागीय आयुक्त (शिक्षण विभाग) नागपूरकडे पालक व शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी यांची चौकशीसुद्धा सुरू आहे. सदर शिक्षकाच्या बदलीसाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना वारंवार लेखी तक्रार व निवेदन देण्यात आले. पण याकडे कोणाचेही लक्ष नाही. शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली असून पदविधर शिक्षकाचे व्यसन व कार्यात अकार्यक्षमता स्पष्ट दिसून येते. हे शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे कसे देतील? अशा प्रश्नचिन्ह उभा दिसत आहे. शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांनी सभेचे आयोजन करून सर्वानुमते ठराव घेतला व असा निर्णय घेतला, जर सदर शिक्षकाची बदली त्वरित झाली नाही तर १० जुलै २०१६ ला शाळेला कुलूप ठोकणार. याबाबत तक्रार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथ.), गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तिरोडा व सर्व शिक्षण विभागातील कार्यालयात लेखी तक्रार दिली. सदर पदविधर शिक्षणाची त्वरित बदली होणार काय? यावर पालकांमध्ये चर्चा होत आहे. (प्रतिनिधी)
व्यसनी शिक्षकांची बदली करा
By admin | Published: July 06, 2016 2:12 AM