सडक अर्जुनी :
सध्या कोरोना महामारीने साऱ्या जगात थैमान घातले असताना नागरिक आपली काळजी घेत घरात बसून सुरक्षितता जोपासत आहेत. त्यातच काही शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या कोंबड्यांच्या लहान पिलांवर चिकन पॉक्स (कांजण्या रोगाचा) च्या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे.
कांजण्या रोगामुळे कोंबड्यांच्या डोळे, नाक, कान व चोचीवर एकप्रकारचा घाव तयार करून, त्यांना आंधळे करून, त्यांचे खाणे-पिणे सुटून ते काही दिवसांत मृत्युमुखी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजारामुळे कोंबडीचे पिल्लू मरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून प्रतिबंधक लस स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी व कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांनी केली आहे.
.....
कोट
चिकन पॉक्स हा विषाणूजन्य आजार असून, कोंबड्यांच्या लहान पिलांवर जास्त प्रमाणात उन्हाळ्याच्या दिवसांत दिसून येत आहे. यावर प्रतिबंधक लस हाच उपाय आहे, तरीपण यामुळे मनुष्यप्राण्याला कुठलीही हानी होत नाही.
-डॉ. श्रीकांत वाघाये, पशुधन विकास अधिकारी, सडक अर्जुनी