थकबाकीदारांवर धडक : ५.७३ लाखांची कर वसुलीगोंदिया : नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेत भाग घेत मंगळवारी (दि.१) खुद्द मुध्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ मैदानात उतरले. जिल्हाधिकाऱ्यांनीही आता कर वसुलीचा विषय गांभीर्याने घेतल्याने मुख्याधिकाऱ्यांना मैदानात उतरण्याची पाळी आली. याचा मात्र कर वसुली अभियानाला लाभ मिळाला असून या मोहिमेतील सर्वात मोठी पाच लाख ७३ हजार रूपयांची कर वसुली पथकाने मंगळवारी केली. पालिकेच्या डोक्यावर साडे नऊ कोटींच्या कर वसुलीचे डोंगर असल्याने कर वसुली विभागाची वसुलीसाठी धडपड सुरू आहे. कर वसुलीसाठी नगर परिषदेत विशेष पथकाचे गठन करण्यात आले असून कर विभाग, कर निर्धारण विभागातील कर्मचारी कर वसुलीच्या कामाला लागले आहेत. कर वसुलीचा हा विषय मागील वर्षी तत्कलीन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनीही गांभीर्याने घेतल्याने नगर परिषदेने ५० टक्केच्यावर कर वसुली केली होती. विशेष म्हणजे २१ जानेवारी रोजी मुख्याधिकारी सुमंत मोरे खुद्द मैदानात उतरून पथकासह कर वसुलीला लागले होते. यंदाही कर वसुलीचा विषय जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी गांभीर्याने घेतला आहे. कर वसुलीच्या विषयाला घेऊन ते आढावा ही घेत आहेत. त्यातल्या त्यात त्यांना गरज पडल्यास त्यांनी मुख्याधिकाऱ्यांनाही मैदानात उतरण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.१) मुख्याधिकारी वाहूरवाघ हे सुद्धा पथकासह कर वसुलीसाठी निघाले. मंगळवारी पथकाने रामनगर, टी.बी. टोली व रेलटोली परिसरातील काही मोठ्या थकबाकीदारांकडे धडक दिली. खुद्द मुख्याधिकारी सोबत असल्याने कर वसुली मोहीमेचा वेगळाच प्रभाव दिसून आला. यातच पथकाने मंगळवारी यंदाच्या मोहिमेंतर्गत रोख व धनादेश मिळवून पाच लाख ७३ रूपये एवढी सर्वाधिक वसुली केली.विशेष म्हणजे मुख्याधिकारी आता स्वत: मैदानात उतरल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून कर वसुली मोहिमेला शहरवासीयांचे सहकार्य मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)मैदानात उतरण्यास केला उशीरमागील वर्षी कर विभागाने १ जानेवारीपासूनच कर वसुली अभियानाला सुरूवात केली होती. अभियानात २१ जानेवारी रोजी मुख्याधिकारी मोरे यांनी उडी घेत स्वत: थकबाकीदारांकडे जाऊन कर वसुली करू लागले होते. याचे फलीतही नगर परिषदेला चांगलेच लाभले. यंदाही मुख्याधिकारी वाहूरवाघ कर वसुलीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यांना मात्र यात चांगलाच वेळ लागला आहे. आता फक्त एक महिनाच उरला असून ते सुरूवातीलाच मैदानात उतरले असते तर याचे रिजल्ट काही वेगळेच आले असते.
मुख्याधिकारी उतरले मैदानात
By admin | Published: March 03, 2016 1:41 AM