गोंदिया : नगर परिषदेची कर वसुली मोहीम सुरू असतानाच मंगळवारी (दि.२०) मुख्याधिकारी सुमंत मोरे सुद्धा मैदानात उतरले. त्यांच्या सहभागाने पथकाचे मनोबल वाढल्याचे दिसून आले व त्यातच पथकाने सुमारे १.९७ लाख रूपयांची कर वसुली केली. पथकाने बाजार परिसरात धडक देऊन केलेल्या वसुलीमुळे मात्र अन्य लोकांचे धाबे दणानल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या डोक्यावर ११ कोटींच्या कर वसुलीचे डोंगर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे पगार अडवून ठेवले आहेत. कर वसुली आणा तेव्हाच पगार मिळणार या त्यांच्या पवित्र्यामुळे कर्मचारी जोमाने कामाला लागले असून सोमवारपासून (दि.१९) कर वसुली मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी गठित करण्यात आलेल्या कर वसुली पथकाने श्रीनगर, रामनगर व गौतमनगर परिसरात मोहीम राबविली. विशेष म्हणजे मंगळवारी (दि.२०) नगर परिषदेचे मुख्याधिकारी मोरे खुद्द कर वसुली मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसून आले. मोरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी पथकाने बाजार परिसरात धडक दिली. खुद्द मुख्याधिकारी सोबत असल्याने कर वसुली मोहीमेचा वेगळाच प्रभाव दिसून आला. तर पथकानेही एक लाख ८७ हजार रूपये नकद व १० हजार रूपयांचे धनादेश मिळवून घेतले. याशिवाय काही व्यापाऱ्यांकडून सुमारे ५.५० लाख रूपयांचे पोस्ट डेटेड चेकही पथकाने मिळविले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कर वसुलीमुळे शिवाय हे पथक सोबत मालमत्ता सील करण्यासाठी तयारी करून निघत असल्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. अशाच पद्धतीने कर वसुली सुरू राहिल्यास मोठ्या प्रमाणात कर वसुली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मात्र मोहीमेला मधातच ब्रेक न लागल्यास हे शक्य होणार आहे. करिता पालिकेने सुरू केलेली ही कर वसुली मोहीम अविरत सुरू राहणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
कर वसुलीसाठी मुख्याधिकारी मैदानात
By admin | Published: January 20, 2015 10:38 PM