पालकांमध्ये तीव्र रोष : नवीन अंगणवाडी इमारत द्या! केसलवाडा : येडमाकोट येथे नवीन अंगणवाडी इमारतीची नितांत आवश्यकता आहे. येथे असलेली जुनी इमारत फारच जीर्ण झाली असून हल्ली भग्नावस्थेत आहे. त्यामुळे चिमुकल्यांचे शिक्षण ग्रामपंचायत ते प्राथमिक शाळा, असे भटकत आहे. सदर इमारत त्या लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना बसण्याच्या योग्यतेची नसल्यामुळे सध्या त्यांना जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये किंवा प्राथमिक शाळेच्या एखाद्या खाली वर्गामध्ये बसावे लागते. परिणामी या विद्यार्थ्यांना अभ्यासावर निट लक्ष केंद्रीत करता येत नाही. या अंगणवाडीमध्ये मुलांची संख्या १० असून १६ मुली असे एकूण २६ लहान-चिमुकले विद्यार्थी भटकत्या अवस्थेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे संबंधित पालकांमध्ये तीव्र नाराजी स्पष्ट दिसून येत आहे. या चिमुकल्या विद्यार्थ्यांना नवीन व मजबूत अशी अंगणवाडी इमारत केव्हा मिळेल, याकडे संपूर्ण गावकरी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या हिताकडे शासन किंवा संबंधित अधिकारीवर्ग एवढे दुर्लक्ष कसे काय करु शकते? असा गंभीर प्रश्न गावातील व परिसरातील सुज्ज्ञ नागरिकांंना पडला आहे. सदर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पायाच जर कमकुवत राहिला तर त्यांच्या उज्ज्वल भविष्याची इमारत मजबूत कशी होईल? असा प्रश्नदेखील संबंधित पालकांना पडला आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर व महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. सदर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या अंगणवाडीतील शिक्षणाचे भान ठेवून त्वरित लक्ष देऊन नवीन व मजबूत अशी अंगणवाडी इमारत शक्य तितक्या लवकर तयार करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू कापसे यांनी सर्व ग्रामस्थ आणि संबंधित पालकांच्या वतीने केलेली आहे. (वार्ताहर)
जीर्ण इमारतीमुळे बालकांचे भटकते शिक्षण
By admin | Published: February 01, 2017 12:44 AM