लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील जुना बसस्थानक जवळ आढळलेल्या तरूणाच्या मृतदेहाचा उलगडा झाला असून फक्त १०० रूपयांसाठी मित्रानेच त्या तरूणाला ठार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दोन तासातच हे प्रकरण सोडविले असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. चिंटू उर्फ चिराग रमेश शेंडे (२३,रा.झोपलेला हनुमान मंदिर, गौतमनगर) असे मृत तरूणाचे नाव आहे.चिंटूने आरोपी विजय प्रेमलाल शहारे (२१,रा. बंडू चौक संजयनगर) याला काही दिवसांपूर्वी ५०० रूपये उसनवारीवर दिले होते. त्यातील ४०० रूपये त्याने परत केले. तर उरलेले १०० रूपये चिंटूने त्याला शुक्रवारी (दि.७) मागीतले असता आरोपी विजय शहारे याने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले व काही वेळातच चिंटूचा मृत्यू झाला. मृत चिंटू हा मागील एक वर्षापासून हटवार नावाच्या इसमाकडे मालवाहक टेम्पोवर चालक म्हणून काम करीत होता.याबाबत शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, हवालदार राजू मिश्रा, जागेश्वर उईके, सुबोध बिसेन, ओमेश्वर मेश्राम, रॉबीन साठे, छगन विठ्ठले, आडे, नरेश मोहरील व प्रशांत मेश्राम यांनी केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
१०० रूपयांसांठी केले चिरागला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 8:31 PM
येथील जुना बसस्थानक जवळ आढळलेल्या तरूणाच्या मृतदेहाचा उलगडा झाला असून फक्त १०० रूपयांसाठी मित्रानेच त्या तरूणाला ठार केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दोन तासातच हे प्रकरण सोडविले असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ठळक मुद्देआरोपीला दोन तासात अटक : मित्राला पैसे देणे जीवावर बेतले