हड्डीटोली चौकीवर पूल बांधकाम सुरू करा
गोंदिया : शहरातील हड्डीटोली येथील रेल्वेचौकीवर रेल्वेगाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने नागरिकांना चौकावर ताटकळत उभे राहावे लागते. येथे उड्डाणपूल तयार झाल्यास नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही. आता पुलाला मंजुरी मिळाली आहे, मात्र लवकर काम करण्याची मागणी आहे.
कचरापेट्यांकडे आहे दुर्लक्ष
केशोरी : येथील ग्रामपंचायत स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये यासाठी चौकाचौकात कचरापेट्या ठेवण्यात आल्या. मात्र या कचरापेट्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. यावरून ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे किती दुर्लक्ष आहे, हे दिसून येते.
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला
सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे. मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांकडून ग्रामीणांची लूट केली जाते.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा
तिरोडा : शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे.
दुसरा हंगाम आला तरी बोनस मिळेना
इसापूर : अर्जुनी मोर तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथील फळीवर सन २०१९ मध्ये तेंदूपत्ता नेणाऱ्या लोकांना बोनस अजूनपर्यंत न मिळाल्याने तो त्वरित देण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. आता यावर्षीच्या तेंदूपत्ता हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र मागील वर्षीचे बोनस न मिळाल्याने मजुरांमध्ये रोष व्याप्त आहे.
दिवसाही सुरू असतात पथदिवे
गोंदिया : नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भरदिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे नगर परिषदेवर विजेचा भुर्दंड बसत असतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
निराधारांचे अनुदान त्वरित द्या
शेंडा कोयलारी : परिसरातील निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील तीन-चार महिन्यापासून अनुदान जमा झाले नाही. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
केव्हा तयार होणार प्रमुख रस्ता?
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी गावाच्या मध्य भागातून रस्ता असल्याने येथे वर्दळ असून धोका वाढला आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून बायपास रस्ता अजूनही तयार झाला नाही.
शहरातील मजुरांच्या हाताला काम केव्हा?
अर्जुनी मोरगाव : येथे नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून गेल्या पाच वर्षांत शहरातील एकाही मजुराला मग्रारोहयोचे काम मिळाले नाही. त्यामुळे मजुरांवर बेरोजगार होऊन उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनामुळे खेळाडूंचे भविष्य अंधारात
देवरी : शासनाने आदेश काढून बंदी हटविली आहे. मात्र याला क्रीडाक्षेत्र स्पर्धांसाठी तसेच मैदानावरील सरावासाठी अद्याप क्रीडा विभागाने कोणताही आदेश काढला नसल्याने खेळाडूंचे भविष्य अंधारात आहे.
युवावर्ग करीत आहे गोळ्यांची नशा
गोंदिया : नकली दारूमुळे होणारी बाधा, सोबत दारूच्या वाढलेल्या किमती, ग्रामीण भागातील युवकांना परवडत नाही. याला पर्याय त्यांनी शाेधून काढला आहे. आता नशा आणणारी औषधे आणि टॅबलेटचा वापर युवा वर्ग नशेसाठी करीत आहे. ग्रामीण भागात सध्या गोळ्यांनी नशा करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्यसनी लोकांची पहिली पसंती मुन्नका आहे. यासोबत बऱ्याच औषधांचा उपयोग नशेसाठी केला जात आहे.