गोंदिया : चोरीच्या प्रकरणात आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. अटकेत असलेल्या आरोपी राजकुमार अभयकुमार धोती (३०, रा.कुंभारटोली) याचा पोलीस कोठडीतच शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणात आय विटनेस असणाऱ्या दोन आरोपींचे बयाण सीआयडीने आमगावच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत बयाण सीआयडीने नोंदविले आहे. त्या विटनेसवर कसल्याही प्रकारचा दबाव राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.
या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशीच भूमिका सीआयडीने घेतल्यामुळे या प्रकरणातील दोषी सुटणार नाही अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत. या प्रकरणाची संपूर्ण माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक यांच्याकडे दिली जाते. या घटनेवर ते स्वत: नजर ठेवून आहेत.
राजकुमार धोती याचा पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप बहिणीने केला होता. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी म्हणून राजकुमारसोबत त्याच गुन्ह्यात अटक झालेले सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या दोघांचे बयाण सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आमगाव येथील न्यायाधीशांच्या समोर घेतले आहे.
बॉक्स
गुन्हा दाखल होणार
पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या राजकुमार धोती याच्या मृत्यूप्रकरणात जे-जे व्यक्ती दोषी आहेत त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पोलीस कोठडीत काय काय घडले, कुणी-कुणी मारले, कोणत्या पोलिसाची कोणती भूमिका इत्थंभूत सर्व बाबी आय विटनेसकडून सीआयडीने नोंदवून घेतल्या आहेत.