दूषित पाण्याचा पुरवठा : जलशुद्धीकरण यंत्रात बिघाड, नळाचे पाणी गढूळसौंदड : सौंदडमध्ये अनेक दिवसांपासून पिण्याच्या दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे येथील नागरिक जलजन्य आजाराने त्रस्त झाले आहेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सौंदड येथील नळाद्वारे पाणी पुरवठा वाटप केला जातो. मात्र दोन्ही पाण्याचे नमूने दूषित असूनही ग्रामपंचायतद्वारे पिण्याकरिता पाणी पुरवठा केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून जलशुद्धी यंत्रात बिघाड झाल्यामुळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे नळाचे पाणी चिखलयुक्त असते. त्यामुळे सौंदड येथील सहा हजार ५११ नागरिकांना साथीचे आजार जडण्याची दाट शक्यता आहे. चुलबंद नदी काठावर स्मशान भूमी असून गावापासून दोन किमी अंतरावर पंपहाऊस आहे. पावसाळ्यात नदीचे पाणी गढूळ व चिखलयुक्त असते. तेच पाणी पंपहाऊस (विहीर) मध्ये येत असल्याने विद्युत पंपाद्वारे पाणी टाकीत टाकल्या जाते. तसेच पाणी नळाद्वारे नागरिकांना पिण्यासाठी दिले जात आहे. पाणी टाकीत शुद्धीकरण केले जात नाही. तुरटी, ब्लिचिंगचा वापर केला जात नाही. त्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. चिखलयुक्त क्षार पाण्यात येते व भांड्यात साचते. दर वर्षाकाठी पाण्याचा कर वसूल केला जातो. शिवाय पाणी शुद्धीकरणाच्या नावावर ग्रामपंचायत लाखो रुपये खर्च दाखविते. शासनाचा पाणीपुरवठा विभाग पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. असे असतानाही नागरिकांना अशुद्ध पेयजल उपलब्ध होत असून आरोग्याची समस्या उद्भवत आहे.मागील काही महिन्यांपासून जलशुद्धी यंत्रात बिघाड झाल्यामुळे नागरिकांना पिण्याचा दूषित पाणी पुरवठा होत आहे. संबंधित यंत्र दुरूस्तीकरिता किमान १० ते १५ हजार रुपयांचा खर्चसुद्धा ग्रामपंचायतला झेपत नाही काय? त्याची दुरुस्ती अजूनही का करण्यात आलेली नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. प्रशासन दरवर्षी जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करते. पावसाळ्यापूर्वी ग्रामसेवक, आरोग्य विभाग, ग्रामपंचायतीला प्रशिक्षण दिले जाते. पण शासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकाची नियोजनशून्यता व दुर्लक्षपणामुळे नागरिकांना चिखलयुक्त दूषित पाणी प्यावे लागत आहे. दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे नियोजन ग्रामसभेद्वारे केले जाते. परंतु नियोजनानुसार कार्य केले जात नाही. गावात पिण्यासाठी पाण्याचे शुद्धीकरण करून पुरवठा करण्यात यावे, अशी मागणी सौंदड येथील महिलांनी केली आहे. साथीचे रोग पसरल्यास ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)सलग चार दिवस पाणीपुरवठा खंडितसंपूर्ण वर्षभरासाठी पाणी पुरवठा करण्याचे काम ग्रामपंचायतीने करावयाचे असते. मात्र आठवड्यामध्ये सलग चार ते पाच दिवस नागरिकांना पिण्याकरिता नळाद्वारे पाणी वाटप केला जात नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याकरिता महिलांना हातपंप, विहिरींकडे धाव घ्यावी लागते. तरीही प्रशासन गप्प आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी पाण्याचे नमूने तपासण्याकरिता पाठवितात. ते पाणी दूषित असल्याचेही सांगतात. परंतु आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष करीत आहे.
जलजन्य आजाराने नागरिक त्रस्त
By admin | Published: September 24, 2016 1:52 AM