...तर आमच्या गावांचे मध्यप्रदेशात विलीनीकरण करा; नागरिकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 11:44 AM2023-02-28T11:44:59+5:302023-02-28T11:49:46+5:30
आठ वर्षांपासून समस्या कायम
गोंदिया : राज्य सरकारचे दुर्लक्ष व वेळकाढू धोरणामुळे गोंदिया जिल्ह्यातील आठ गावे मध्यप्रदेशला विलीनीकरणाची मागणी आमगाव नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे. आमगाव, बनगाव, किडंगीपार, माल्ही, पदमपूर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा ही गोंदिया जिल्ह्यातील आठ गावांचे विलीनीकरण सीमावर्ती राज्य मध्यप्रदेश येथे करावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. २७) येथील स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालय गाठून निवेदन निवेदन दिले.
आमगाव तालुक्यातील या आठ गावातील लोकसंख्या जवळपास ४० हजार असून त्यांचे राज्य सीमावर्ती भाग हा मध्यप्रदेश राज्याला लागून आहे. महाराष्ट्र सरकारने मागील आठ वर्षांपासून नगर पंचायत ते नगरपरिषद स्थापनेचा वाद निर्माण करून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट ठेवले आहे. न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे राज्य सरकारने प्रशासक कारभार सुरू ठेवला आहे. यामुळे २०१४ नंतर याठिकाणी सार्वत्रिक निवडणूक झाली नाही.
लोकप्रतिनिधी निवडणूक झाली नसल्याने व योजना विकास निधी मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे या भागाचा विकास झाला नाही. यामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. शासन आमगाव नगर परिषद की नगरपंचायत या संदर्भात निर्णय घेण्यास विलंब करीत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. याच प्रकाराला कंटाळून नागरिकांनी ही मागणी केली आहे.