सडक-अर्जुनी : तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघाच्या संयुक्त वतीने तालुक्यातील ग्राम पटेकुरा, डव्वा, कोहमारा, पळसगाव व राका येथे विविध विषयांवर कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले.
शिबिरात तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व दिवाणी न्यायाधीश क. स्तर विक्रम आव्हाड, ॲड. गिऱ्हेपुंजे, ॲड. राऊत, ॲड. रहांगडाले, ॲड. रंगारी, ॲड. गहाणे तसेच प्रा. डॉ. राजकुमार भगत प्रामुख्याने उपस्थित होते. 'न्याय सर्वांसाठी' या संकल्पनेनुसार न्यायापासून कोणीही वंचित राहू नये तसेच नागरिकांना त्यांच्या हक्क, अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी या उद्देशाने कायदेविषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, असे न्या. आव्हाड यांनी सांगितले. ०२ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालखंडात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमातंर्गत ग्रामीण भागात तसेच दुर्गम व अतिदुर्गम भागात जन सामान्यांना कायद्याचे ज्ञान मिळावे व कायदा साक्षरता व्हावी या हेतूने विविध कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.
या शिबिरात कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम, ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार, अटक झाल्यानंतर आरोपीचे अधिकार, ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ मधील तरतुदी, भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहितामधील महत्त्वाच्या तरतुदी तसेच भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य तसेच विधी सेवा प्राधिकरणकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरासाठी न्यायालयातील सहायक अधीक्षक भालेराव, वरिष्ठ लिपिक डोंगरे, कनिष्ठ लिपिक उपरीकर यांनी सहकार्य केले.