पोलीस रेझिंग डे : साखरीटोल्यातील कार्यक्रमात दीपाली खन्ना यांचे आवाहनसाखरीटोला : नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची भावना जोपासावी. पोलीस हे जनतेचे मित्र आहेत. तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल तर पोलीस ठाण्यात संपर्क साधा. आपल्या हातून गुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्या, पोलीस नऊ पावले चालतात, तुम्ही एक पाऊल चला व गुन्हेगारी समाप्त करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन आमगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना यांनी केले. साखरीटोला येथे बुधवारी पोलीस रेझिंग सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सालेकसा पोलीस ठाण्याच्या वतीने साखरीटोला (सातगाव) येथील ग्रामपंचायतच्या पटांगणावर पोलीस रेझिंग सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीवायएसपी दीपाली खन्ना, तर अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक मोहन खांदारे, सभापती हिरालाल फाफनवाडे, सरपंच संगीता कुसराम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, डॉ. संजय देशमुख, रमेश चुटे, राजू काळे, प्राचार्य सागर काटेखाये, तंमुस अध्यक्ष लक्ष्मीनारायण लांजेवार, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक आय.गजभिये, मुख्याध्यापिका अजया कठाणे, पोलीस पाटील भरत बहेकार, माजी पं.स.सदस्य संगीता शहारे, टी.जी.फुंडे, प्रा.व्ही.एस.दखने उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी पोलीस विभागाच्या बॅन्ड पथकासह विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा.एम.एम.वाघमारे यांनी तर आभार प्राचार्य काटेखाये यांनी मानले. (वार्ताहर)
गुन्हेगारी संपविण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे
By admin | Published: January 08, 2016 2:25 AM