गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, त्याला प्रतिबंध लावण्यासाठी १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही सर्वांसाठीच दिलासादायक बाब आहे, पण लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्यासाठी पुढे महानदान करावे.
मागील वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे रक्तदान शिबिरांवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. परिणामी, रक्तपेढ्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, गरजूंना वेळीच रक्त मिळणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तसंकलन पेढीतून दररोज ३० ते ३५ रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. सिकलसेल, थैलिसीमीया, रक्तक्षय असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करणे गरजेचे असून, रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, तर रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प असून, कसे तरी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन केले जाते. आता कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला त्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. अशात येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होणार. करिता रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यानंतर लस घ्यावी, असे रक्तपेढीतून कळविले जात आहे. आधीच रक्तदाते कमी असून, त्यात मागील वर्षीपासून कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे दिसत आहे. काही सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून येथील रक्तपेढीची गरज भागविण्यात आली. अशात कसे तरी वर्ष निघून गेले. मात्र, आता कोरोना लस आली असून, मोठ्या प्रमाणात नागरिक लस लावून घेत आहेत. यामध्ये युवकांचे प्रमाणही अधिक असून, रक्तदान करणारे हे युवकच आहेत. त्यातच १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांनी लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे.
.....
लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करण्याची अडचण
एनबीटीसीच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाची लस घेणारी व्यक्ती त्यानंतर २८ दिवस रक्तदान करू शकणार नाही. म्हणजेच हजारोंच्या संख्येत लस घेणारे युवक रक्तदान करू शकणार नाही. असे झाल्यास रक्तपेढीला रक्ताचा पुरवठा बंद पडणार व ही बाब गंभीर आहे. येथील बाई गंगाबाई रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीतूनच जिल्ह्यासह लगतच्या राज्यांतील गरजूंनाही रक्ताचा पुरवठा केला जातो. मात्र, रक्तपेढीलाच रक्तदाते न मिळाल्यास याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.........
युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे
रक्तदात्यांमध्ये जिल्ह्यात ४५ ते ५० वर्षे वयोगटांतील खूप लोक आहेत. ते आता लस घेत असल्याने, त्यांना पुढचे २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. अशात त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून लस घेण्यापूर्वी रक्तदान करणे गरजेचे आहे. लस घेण्याच्या तयारीत असलेल्या लोकांनी आधी रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
.............
शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा
येथील शासकीय रक्तपेढीत दररोज ३० ते ३५ युनिट रक्ताची मागणी असते. सोमवारी येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील रक्तसंकलन केंद्रात १२७ युनिट रक्त शिल्लक होते. यामध्ये ए-पॉझिटिव्ह २८, ए-निगेटिव्ह १, बी-पॉझिटिव्ह २६, बी-निगेटिव्ह २, ओ-पॉझिटिव्ह ६१, ओ-निगेटिव्ह १, एबी-पॉझिटिव्ह ८, एबी-निगेटिव्ह रक्त गटाची ० युनिट उपलब्ध होती.
...............
कोरोनामुळे रक्तदान नाहीच्याच बरोबर होत आहे. सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांनी पुढे येऊन रक्तदान केले. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता आला. आता कोरोनाचे लसीकरण होत आहे. या लसीकरणासाठी कोरोनाची प्रतिबंधित लस घेणाऱ्यांना २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लस घेण्यापूर्वीच रक्तदान करावे.
-डॉ.सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी गोंदिया