गोंदिया : हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हत्तीरोग निर्मूलन मोहीम गुरुवारपासून (दि.१) जिल्ह्यात सुरू झाली असून नागरिकांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा, असे जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी मोहिमेचे शुभारंभ सांगितले.
आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात खवले यांनी प्रत्यक्ष डीईसी व अलबेंडाझोल गोळ्यांचे सेवन करून हत्तीरोग निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे उपस्थित होते. डॉ. कापसे यांनी, हत्तीरोगाचे निर्मूलन करण्यासाठी कायमस्वरूपी असलेल्या आजार मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर रोगामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीही मनात कोणतीही शंका न बाळगता सदर गोळ्यांचे सेवन करू शकतात. डॉ. चौरागडे यांनी, माहिती १ ते १५ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या घरापर्यंत येणार असून हत्तीरोग निर्मूलनाच्या दृष्टीने गरोदर माता, अती गंभीर आजारी रुग्ण व २ वर्षाखालील बालके वगळता पात्र नागरिकांनी वयोगटानुसार डीईसी व अलबेंडाझोलच्या गोळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष सेवन कराव्या. या गोळ्या उपाशीपोटी खाऊ नये. जेवण केल्यावर अथवा अल्पोपाहार घेतल्यानंतरच सदर गोळ्यांचे सेवन करावे. हत्तीरोग आजार जरी भयानक असला तरी हा आजार होणे आपण टाळू शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
--------------------------
गोळ्यांचे काहीच दुष्परिणाम नाही
आरोग्य विभागातर्फे गुरुवारपासून सुरू झालेल्या सामुदायिक हत्तीरोग औषधोपचार मोहिमेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या डीईसी. व अलबेंडाझोल गोळ्यांचे काहीही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचे समुळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मनात कोणतीही शंका न बाळगता डी.ई.सी. व अलबेंडाझोल गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.