परसवाडा : तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात कोविड लसीकरणाचे योग्य नियोजन नसल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे.
तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात १२ ते १३ एप्रिलदरम्यान कोव्हॅक्सिनचे पहिले डोस घेतलेल्या नागरिकांना २८ ते ४५ दिवसांनंतर शुक्रवारी (दि.२८) दुसरा डोस घेणे बंधनकारक होते; पण ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊन ही उपजिल्हा रुग्णालयात दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन उपलब्ध नसल्याने पहिला डोस घेतलेल्या नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे.
ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिल डोस घेतला आहे ते गेल्या १५ दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयात दुसऱ्या डोससाठी नियमित विचारपूस करीत असून रुग्णालयातील संबंधित कर्मचारी कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा नसल्याचे सांगत होते; पण आता ४५ दिवस लोटूनही कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न मिळाल्याने ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्या लोकांना आता स्वतःच्या प्रकृतीबद्दल चिंता होत आहे. कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसबद्दल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांना विचारले असता आम्ही मागील दिवसांत अनेकदा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे दुसऱ्या डोसच्या उपलब्धतेबद्दल पाठपुरावा केला; पण आजपावेतो तरी कोव्हॅक्सिन उपलब्ध झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे संपूर्ण देशात कोविड लसीकरणासाठी इतका गाजावाजा होत असून तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचे ४५ दिवस पूर्ण होऊन ही लसींसाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. यावरून तिरोडा उपजिल्हा रुग्णालय लसीकरणाच्या बाबतीत किती गंभीर आहे, हे लक्षात येते.