गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत एकोडी येथे आरोग्य वर्धिनी इमारतीचे बांधकाम करण्यात
आले आहे. या इमारतीमध्ये एकोडी परिसरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.
शनिवारी (दि.१४) एकोडी येथील आरोग्य वर्धिनी केंद्र इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल होते. यावेळी आमदार विजय रहांगडाले, आमदार अभिजीत वंजारी, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी नयना गुंडे व पोलीस अधीक्षक विश्व पानसरे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. मलिक यांनी, स्व. मोतीराम पेशने यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीसाठी एक
एकर जागा दान दिली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला जमीन दान दिलेल्या स्व.मोतीराम पेशने यांचे नाव
देण्यात यावे अशी सर्वानुमते मागणी असल्यामुळे ग्रामपंचायत सभेत प्रस्ताव तयार करुन जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावाला निश्चितच मान्यता देण्यात येईल असे आश्वासित
केले. तसेच आरोग्य वर्धिनी केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा त्यालाही मान्यता देण्यात येईल असे सांगितले.
खासदार पटेल यांनी, एकोडी क्षेत्रासाठी अतिशय उपयुक्त अशी वास्तू प्राथमिक आरोग्य केंद्र दर्जेदार इमारत तयार झाली आहे. याचा फायदा नक्कीच या क्षेत्रातील नागरिकांना होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सेवा मिळाव्यात
यासाठी प्रयत्नशील आहे. लवकरच मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात
येणार आहे. मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस
देण्यात येत आहे. बोनसच्या स्वरूपात १४०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. ५० टक्के रुक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
जमा झाली आहे. येणाऱ्या काही दिवसात लवकरच उर्वरित ५० टक्के रक्कम जमा करण्यात
येणार आहे. शेतकऱ्यांना १८६८ रुपये हमीभाव व ७०० रुपये बोनस देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी
खंबीरपणे उभा असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहे असे सांगितले.
आमदार रहांगडाले यांनी, आरोग्य विभागात पदभरती करण्यात यावी, जेणेकरुन नागरिकांना
आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देता येतील. प्राथमिक आरोग्य केंद्र सुकळी, बेरडीपार व वडेगाव येथील इमारतीचे
बांधकाम पूर्ण करुन उद्घाटन करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. धापेवाडा टप्पा-2 चे काम पूर्ण झाले आहे. यामुळे
३० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे असे सांगीतले. आमदार वंजारी यांनी, एकोडी येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला आरोग्याच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे यांनी मांडले. संचालन हेमंत पटले यांनी
केले. आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश वैरागडे यांनी मानले.