बिरसी-फाटा : तिरोडा शहरातील स्वच्छतेकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याने बघावे तेथे घाणच घाण असून, शहराला घाणीने विळखा घातला आहे.
शहरात स्वच्छता नाममात्र सुरू असून, शहीद मिश्रा विद्यालय, मटन मार्केट व अन्य परिसरांमध्ये अनेक ठिकाणी घाण पसरली आहे. मुख्याधिकारी प्रभारी असल्यामुळे विविध समस्या पहावयास मिळत आहेत. नागरिकांना नगर परिषदेकडून प्राप्त सुविधा कागदांवरच पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या प्रमुख समस्यांकडे कायम दुर्लक्ष करीत नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी दिवस काढत आहेत. शहरातील अनेक हातपंप सध्या नादुरुस्त असून, आता उन्हाळा सुरू झाल्याने पाण्यासाठी नागरिकांची इतरत्र भटकंती होताना दिसत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे नगर परिषदेने पाठ फिरविली आहे. कोविड-१९ बघता नागरिकांना भीती सतावत आहे. कोरोनाकाळात स्वच्छ व सुंदर शहराची संकल्पना शासनस्तरावर राबविली जात असताना मात्र, नगर परिषदेच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरातील प्रत्येकच भागात मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. याविषयी शहरातील सुज्ञ नागरिकांनी नगर परिषदेत तोंडी तक्रार नोंदविली आहे, पण निगरगट्ट नगर परिषद प्रशासनाला याविषयी काहीच घेणे-देणे नसल्याचे दिसते.